हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अजित पवार यांच्या बंडखोरीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आजपासून महाराष्ट्रात झंझावाती दौरा सुरु केला आहे. पवारांनी आपला पाहिलाच दौरा छगन भुजबळ यांच्या येवला मतदारसंघात केला. यावेळी शरद पवार यांनी जाहीर भाषणात छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधला. माझा अंदाज चुकला, तुम्हाला त्रास झाला त्यामुळे मी येवल्याच्या जनतेची माफी मागतो असं शरद पवार यांनी म्हंटल. तसेच इथून पुढे मी ही चूक करणार नाही असं म्हणत भुजबळांना इशाराही दिला.
शरद पवार म्हणाले, आज मी येवल्यात कोणाचं कौतुक करण्यासाठी आलेलो नाही, मी कोणावर टीका करण्यासाठीही आलेलो नाही. आज मी येवल्यातील जनेतची माफी मागण्यासाठी आलो आहे. खरं तर माझा अंदाज कधी चुकत नाही, पण इथे माझा अंदाज चुकला. इथल्या लोकांना आम्ही दिल्लीत जाण्याची संधी दिली. भक्कम विश्वासाच्या मतदारसंघाची आम्हाला आवश्यकता होती, त्यामुळं आम्ही येवल्याची निवड केली. मी दिलेली नावं कधी चुकली नाहीत पण एका नावानं घोटाळा झाला. माझ्या विचारावर तुम्ही निकाल दिले. आता तुम्हाला यातना झाल्या. तुम्हाला या यातना माझ्या निर्णयामुळे झाल्या असतील त्यामुळे मी तुमची माफी मागतो अशी भावनिक साद शरद पवार यांनी येवल्याच्या जनतेला केली. यानंतर मी पुन्हा कधी लोकांच्या समोर येईल, महिन्यांनी येईन किंवा वर्षाने येईन. परंतु त्यावेळी मी माझी चूक पुन्हा करणार नाही असं म्हणत शरद पवारांनी छगन भुजबळ यांच्यावर कडक शब्दात निशाणा साधला.
नाशिक जिल्ह्याचा इतिहास वेगळा आहे. स्वातंत्र्याच्या लढ्यात परकीयांच्या विरोधात लढण्यासाठी तात्या टोपेंनी एक ऐतिहासिक काम केलं. त्यांची हि भूमी आहे. स्वातंत्र्य चळवळी मध्ये हा तालुका अग्रेसर राहीला. या भागातील जनतेला अनेक वर्ष तुरुंगात जावं लागलं, परंतु परकीयांच्या हातात आपला देश जाऊ नये या विचाराचे जतन इथल्या जनतेने केलं. इथली जनता कधी स्वाभिमान सोडणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसवर भ्रष्ट्राचाराचे आरोप केले, पण माझं त्यांना आव्हान आहे, माझ्या पक्षातील ज्या ज्या लोकांनी भ्रष्ट्राचार केलाय त्यांची कोणतीही यंत्रणा वापरून चौकशी करा आणि दोषी आढलळ्यास पाहिजे ती शिक्षा त्यांना द्या असेही शरद पवार म्हणाले.