कराड प्रतिनिधी । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे नेहमीच त्यांच्या लढाऊ बाण्यासाठी आणि कधीही हार न मारण्याच्या वृत्तीसाठी ओळखले जातात. परिस्थिती कशीही असली तरी पवार डगमगत नाही आणि हार मानत नाहीत असं म्हंटल जातं, याचा प्रत्यय यापूर्वीही आलाय आणि आजही पुन्हा एकदा हीच गोष्ट अधोरेखित झाली आहे. अजित पवार यांनी आपल्या ३० पेक्षा अधिक समर्थक आमदारांसह पक्षातच फूट पाडत शरद पवार यांच्या वर्चस्वाला धक्का देण्याचा प्रयत्न केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी शरद पवार ऍक्शन मोडमध्ये आलेत. कराड येथे यशवंतराव चव्हाणांच्या समाधीस्थळी अभिवादन केल्यानंतर त्याठिकाणी असलेल्या वडाच्या झाडाच्या पारावर उभं राहून पवारांनी दमदार भाषण केलं, आणि पुन्हा एकदा पक्षाच्या बांधणीसाठी ८३ वर्षाचा हा योद्धा तयार असलयाचे दाखवून दिले.
काल महाराष्ट्राच्या आणि खास करून राष्ट्रवादीच्याच अंतर्गत राजकारणात मोठा भूकंप घडला. अजित पवार यांनी छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल अशा शरद पवारांच्या (Sharad Pawar) खास मर्जीतील नेत्यांना आपल्याकडे वळवून भाजपसोबत मंत्रिपदाची शपथ घेतली. इतकंच नव्हे तर इथून पुढे आम्ही सर्व नेते राष्ट्रवादीच्या घड्याळ या चिन्हांवरच निवडणूक लढवणार असं म्हणत त्यांनी थेट पक्षावरच दावा केला. अजितदादांच्या या भूमिकेनंतर कोणी कितीही दावा केला तरी मी कोर्टात न जाता जनतेच्या न्यायालयात जाणार असं पवारांनी म्हंटल होत. आज बंडाच्या दुसऱ्याच दिवशी पवार जनतेच्या न्यायालयात गेले आणि त्यांनी त्यासाठी ठिकाण शोधलं ते म्हणजे आपले राजकीय गुरु स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचे समाधीस्थळ असलेले कराड….
कराड येथे शरद पवार (Sharad Pawar) यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेतलं. राजकीय वातावरण ताज असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आणि शरद पवार यांच्यावर प्रेम करणाऱ्या जनतेने प्रीतिसंगम परिसरात मोठी गर्दी केली. अक्षरशः उभं रहायला जाग नव्हती असं म्हंटल तरी चालेल. याच जनतेच्या गराड्यात जाऊन शरद पवार यांनी प्रीतिसंगम परिसरातील वडाच्या झाडाखाली असलेल्या पारावर उभं राहुन कार्यकर्त्यांना संबोधित केलं, आणि आपली पुढील राजकीय दिशा स्पष्ट केली. शरद पवार यांनी प्रथमच असं पारावर उभं राहून जनतेच्या गराड्यात भाषण केल्यानंतर ते यापुढील लढाईसाठी सज्ज असल्याचे सिद्ध झालंय.
शरद पवार हे यशवंतराव चव्हाण यांचे शिष्य, मानसपुत्र मानले जातात. शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचारांचे खरे वारसदार म्हणून त्यांच्याकडे बघितलं पाहिजे. शरद पवारांनी आपल्या भाषणात याच मुद्द्यांना हात घालत भाजपसह राष्ट्रवादीच्या बंडखोर आमदारांवर निशाणा साधला आणि आपले इरादे स्पष्ट केले. यशवंतराव चव्हाण यांनी राज्याच्या राजकारणात नवी पिढी तयार केली. तरूणांचा संच उभा केला. यशवंतराव आज आपल्यात नाहीत. चव्हाण साहेब आपल्यात नसले तरी त्यांनी दिलेला विचार आपल्यासोबत आहे आणि हाच विचार पुढे घेऊन जाण्याची भूमिका आपल्याला घ्यायची आहे असं पवारांनी म्हंटल. शाहू, फुले, आंबेडकर आणि यशवंतराव चव्हाण यांच्या महाराष्ट्रातील सामान्य माणूस हा एकवेळ उपाशी राहील पण महाराष्ट्रातील सामुहिक शक्ती मजबूत केल्याशिवाय राहणार नाही असं म्हणत जनताच या बंडखोर आमदारांना त्यांची जागा दाखवेल असा इशारा पवारांनी दिला.
२०१९ मध्येही पवार जनतेत गेले आणि बाजी पलवटली –
२०१९ मध्येही राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक आमदारांनी शरद पवारांची साथ सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता, पक्ष गळतील लागला होता. मात्र पवारांनी तेव्हाही हार न मानता महारष्ट्रभर आपले दौरे केले आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून पक्षाला सत्तेत आणलं. तेव्हाही अजित पवारांच्या पहाटेच्या शपथविधीनंतर पवारांनी त्यांच्यासोबतच्या आमदाराना परत माघारी आणलं आणि बंड मोडून काढलं.
वय पवारांची अडचण ठरणार? (Sharad Pawar)
शरद पवार यांच्या बाजूने नसलेली एकच गोष्ट म्हणजे त्यांचं वय… पवार सध्या ८३ वर्षांचे आहेत. या वयातही त्यांचा उत्साह आणि काम करण्याची पद्धत तरुणाला लाजवेल अशीच अशीच आहे. परंतु कितीही काही म्हंटल तरी या वयात संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढणे, कार्यकर्ते आणि नेत्यांची मोट बांधून ठेवणं, त्यांना पुन्हा एकदा विश्वास देऊन पक्षाची पुनर्बांधणी करणं शरद पवारांच्या समोर मोठं आव्हान असेल. परंतु शरद पवार यांचे आजच जनतेच्या गराड्यात जाणं, पारावरच उभं राहून भाषण करणं यामुळे त्यांच्यासोबत असलेल्या नेत्यांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये नक्कीच उत्साह संचारला असेल यात काही शंकाच नाही. पवारांचे आजचे भाषण म्हणजे पक्षाच्या पुनर्बांधणीसाठी ८३ वर्षाचा हा लढाऊ योद्धा पुन्हा मैदानात उतरलाय हेच स्पष्ट करतंय.