पुणे प्रतिनिधी | केंद्रातील सरकारचा कारभार हा देशासाठी घातक आहे. सीबीआय ही स्वतंत्र यंत्रणा आहे, या प्रकाराची निःपक्षपातीपणे चौकशी व्हायला हवी होती, मात्र सीबीआयच्या प्रमुखांनाच घरी पाठवण्याचा निर्णय मध्यरात्री देशातील राज्यकर्त्यांकडून घेण्यात आला. याने स्पष्ट आहे की आम्ही सांगू तीच पूर्व दिशा असेल असा अजेंडा हया सरकारचा आहे. ‘संविधान बचाव देश बचाव’ या राष्ट्रवादीतर्फे आयोजित पुण्यातील कार्यक्रमात शरद पवार यांनी सद्य पारिस्थितीचा चांगलाच आढावा घेतला व विद्यमान सरकारवर जोरदार टिका केली.
पुढे चौफेर टिकेबाजी करतांना पवार यांनी शबरीमाला मंदिर याबाबत सरकारचा समाचार घेतला, या राज्यकर्त्यांचा संविधानावर विश्वास नाही. केरळातील सबरीमाला मंदिरात रजस्वला स्त्रियांना प्रवेशबंदी होती. स्थानिक महिलांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली, महिलांच्या बाजूने निकाल लागला. याची अंमलबजावणी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा सहभाग असलेल्या केरळ सरकारने पुढाकार घेतला.
मात्र भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांनी सर्वोच्च न्यायालय असा निर्णय कसा घेऊ शकते हा प्रश्न उपस्थित केला. या भूमिकेमुळे स्पष्ट होते की न्यायव्यवस्थेने दिलेला निर्णय यांना मान्य नाही. स्त्री-पुरुष समानता यांना मान्य नाही. अशा विचारांच्या लोकांच्या हाती सत्ता असणे धोकादायक आहे.