हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान वर्षा या ठिकाणी ही भेट होणार आहे. या भेटीत राज्यातील पूर परिस्थिती, कोरोना आढावा, ओबीसी राजकीय आरक्षण, राज्यात महाविकास आघाडीतील नेत्यांवर ईडीचे धाडसत्र आणि महाविकास आघाडीतले समन्वयाचे मुद्दे अशा विषयांवर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा होण्याची शक्यता आहे.
राज्यात राज्यपाल नियुक्त 12 आमदारांचा विषय अजूनही प्रलंबित आहे. याच पार्श्वभूमीवर गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि बाळासाहेब थोरात यांनी राज्यपालांची भेट घेतली होती. त्यावर देखील पवार – ठाकरे भेटीत चर्चा होण्याची शक्यता आहे.
विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक घेतली होती. या बैठकीत आगामी स्थानिक स्वराज निवडणुकीच्या बाबतीत चर्चा झाली. लांबणीवर पडलेल्या महापालिकेच्या निवडणुका मार्च महिन्यात होण्याची शक्यता आहे त्या पार्श्वभूमीवर पवार- ठाकरे भेटीला महत्त्व प्राप्त झाले आहे.