हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| राष्ट्रवादी पक्षातून बाहेर पडल्याचा फटका अजित पवार गटाला यंदाच्या लोकसभा निवडणुकीत बसला आहे. तर याच निवडणुकीत शरद पवार गटाने (Sharad Pawar Group) मैदान गाजवले आहे. त्यामुळे अजित पवार (Ajit Pawar) यांच्याबरोबर गेलेले 18 ते 19 आमदार पुन्हा शरद पवार यांच्या गटात परत येतील अशी चर्चा सुरू झाली आहे. परंतु पुन्हा घरवापसी करणाऱ्या आमदारांना शरद पवार पक्षात घेतील का असा प्रश्न सगळ्यात विचारला जात आहे. याबाबत स्वतः शरद पवार यांनी उत्तर दिले आहे.
मधल्या काळात अजित पवारांबरोबर गेलेले आमदार पुन्हा पक्षात आले तर शरद पवार गटाची भूमिका काय राहील याबाबत स्वतः शरद पवार यांनी माहिती दिली आहे. माध्यमांशी बोलताना शरद पवार म्हणाले की, “जो कोणी पक्षाच्या हितासाठी कार्य करेल, त्याला आम्ही परत घेऊ” त्याचबरोबर, “पक्षाच्याही त्याला धोका निर्माण करणाऱ्यांना आम्ही परत घेणार नाही” असे शरद पवार यांनी स्पष्ट सांगितले आहे.
इतकेच नव्हे तर, “आम्ही आधी निवडणुका पार पाडू, आणि त्यानंतर पक्षाच्या हिताचे विचार करु. आमच्या पक्षात सहकार्याचा आणि विश्वासाचा महत्त्वाचा आधार आहे. जे सहकाऱ्यांच्या विश्वासाला पात्र ठरतील, त्यांनाच परत घेण्यात येईल” असे सूचक वक्तव्य शरद पवार यांनी केले आहे. त्यांनी केलेल्या या वक्तव्यामुळेच शरद पवार हे अजित पवारांसोबत गेलेल्या समर्थकांना परत घेण्याबाबत सकारात्मक असल्याचे म्हणले जात आहे.
दरम्यान, लोकसभा निवडणूक पार पडल्यापासून राजकीय हालचालींचा वेग वाढला आहे. यात अजित पवारांबरोबर गेलेले आमदार पुन्हा शरद पवार गटात येतील, अशी चर्चा देखील राजकीय वर्तुळात रंगली आहे. तसेच सध्या अजित पवार गटातील अनेक नेते शरद पवार यांच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात येत आहे. त्यामुळे, अजित पवार गटातील समर्थक पुन्हा घर वापसी करतील, अशी दाट शक्यता वर्तवली जात आहे.