यावेळी बोलताना पवारांनी कृतज्ञता व्यक्त करत सर्वांचे आभार मानले. तसेच १२ डिसेंबर हा दिवस त्यांच्यासाठी का महत्वाचं आहे हे सांगितले. पवार म्हणले की १२ डिसेंबर याच दिवशी माझ्या आईचा वाढदिवस असतो त्यामुळे माझ्या वाढदिवसापेक्षा आईचा वाढदिवस म्हणून हा दिवस लक्षात राहतो.
‘माझ्या आईने अनेक कष्ट केले. शेतात काम करायची, जे पिक येईल ते बाजारात पोहचविण्याचं काम करायची आहे. सामाजिक कामाची तिला आवड होती. अतिशय कष्टाने आम्हाला तिने शिकविलं आणि वाढविले. १९३६ साली ती पहिल्यांदा निवडून आली. महिलांच्यावतीने महिलांसाठी काम करता येते हा आदर्श त्यांनी घालून दिला. मुलींचे शिक्षण, आत्मविश्वासाने मुलींनी पुढे आले पाहिजे हा त्यांचा आयुष्यभर आग्रह होता. अनेक गोष्टी तिच्या सांगण्यासारख्या आहेत. सार्वजनिक जीवनात काम करताना अनेकवेळा यश मिळतं. सन्मान मिळतो, कधीकधी संकटं येत असतात. या संकटाला सामोरं जाण्याची शक्ती कोणाकडून येतात याचा विचार मी करतो त्यावेळी २ जण माझ्यासमोर येतात. एक माझी आई अन् दुसरी महाराष्ट्राची जनता असं सांगत पवार भावुक झाल्याचे पाहायला मिळाले.