मोठी बातमी! शिंदे- फडणवीस दिल्लीला रवाना; मराठा आरक्षणावर तोडगा निघणार?

Shinde Fadanvis
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा समाज पेटून उठला असल्यामुळे आता सरकारकडून देखील वेगाने पावले उचलण्यास सुरुवात झाली आहे. कारण, आज मराठा आरक्षणाबाबत निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना झाले आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा सुरू केलेल्या उपोषणाची दखल घेत मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री थेट दिल्लीच्या दौर्यावर गेले असल्याची माहिती समोर आली आहे..

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आज दुपारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना झाले आहेत. मराठा आरक्षणाच्या मुद्द्याला घेऊन दिल्लीत अमित शहा यांच्यासोबत हे दोन्ही नेते चर्चा करतील. तसेच, आरक्षण लागू करण्यासाठी काय-काय करता येईल याबाबत देखील केंद्रिय मंत्र्यांसोबत शिंदे-फडणवीस संवाद साधतील. त्यामुळे आता लवकरच मराठा आरक्षणाबाबत सरकारकडून ठोस निर्णय सुनावण्यात येईल, अशी चर्चा रंगली आहे.

दरम्यान, मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी म्हणून जरांगे पाटील यांनी सरकारला 40 दिवसांची मुदत दिली होती. आज ही मुदत संपल्यामुळे जरांगे पाटील यांनी पुन्हा आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. तसेच राज्यभरात मराठा कार्यकर्त्यांकडून साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे. इतकेच नव्हे तर, जोपर्यंत आरक्षण दिले जाणार नाही तोपर्यंत राजकीय पुढार्‍यांना गावात येता येणार नाही अशी भूमिका मराठा बांधवांनी घेतली आहे. त्यामुळे सध्या राज्यात आरक्षणाच्या मुद्द्याला घेऊन मराठा समाज पेटून उठला असल्याचे दिसत आहे. अशा परिस्थितीत सरकार आरक्षणाबाबत कोणती मोठी घोषणा करेल याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.