शिंदे सरकार 72 तासांत जाणार; नव्या दाव्याने पुन्हा राजकीय खळबळ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन|  शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात आमदार अपात्रतेच्या प्रकरणावरून होणाऱ्या दिरंगाईबाबत याचिकांवर सुनावणी झाली. या सुनावणीदरम्यान सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या कामावर नाराजी व्यक्त केली. तसेच, “सोमवारपर्यंत जर त्यांनी सुनावणीचं वेळापत्रक जाहीर केलं नाही, तर आम्ही त्यांना वेळापत्रक ठरवून देऊ” असे देखील खडसावून सांगितले. दरम्यान, या सर्व घडामोडीनंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारा दावा केला आहे.

सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीनंतर संजय राऊत यांनी म्हणले आहे की, “पुढील 72 तासात राज्यातील शिंदे-फडणवीस-पवार सरकार जाणार आहे. मी 72 तास आधीही बोललो होतो आता ती वेळ आली आहे.” थोडक्यात, संजय राऊत यांनी पुढील 72 तासात शिंदे-फडणवीस-पवार सरकार पडेल आणि दुसरे सरकार उभे राहील” असे स्पष्ट सांगितले आहे. संजय राऊत यांनी केलेल्या या दाव्यानंतर आता पुढील 72 तासात असे काय घडेल याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे.

सध्या संजय राऊत हे नाशिक दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावर असतानाच संजय राऊत यांनी सरकार पडणार असल्याचे भाकीत व्यक्त केले आहे. तसेच राज्य सरकारवर टीका करत, “विधानसभा अध्यक्षांनी ICU मध्ये टाकून सरकार वाचविण्याचा प्रयत्न केला आहे. पण आता त्यांनाच ICU मध्ये जाण्याची वेळ आली आहे. सौ सोनार की एक लोहार, असे आजचे न्यायालयाचे मत आहे” असेही राऊत यांनी म्हणले आहे.

दरम्यान, अपात्र आमदारांच्या प्रकरणावर सुनावणी करण्यास विधानसभा अध्यक्ष जाणूनबुजून उशीर लावत आहेत, अशी टीका ठाकरे गटाकडून केली जात आहे. तर दुसऱ्या बाजूला, याच कारणामुळे विधानसभा अध्यक्षांवर सर्वोच्च न्यायालय नाराजी व्यक्त करत आहे. आज झालेल्या सुनावणीत याच मुद्द्यावरून न्यायालयाने राहुल नार्वेकर यांना चांगलेच झापले आहे. तसेच, “सोमवारपर्यंत जर विधानसभा अध्यक्षांनी सुनावणीचं वेळापत्रक जाहीर केलं नाही, तर आम्ही त्यांना वेळापत्रक ठरवून देऊ. कारण आमचे आदेश पाळले जात नाहीयेत. महाराष्ट्रातील निवडणुकांच्याआधी निर्णय घ्यायला हवा” असे देखील खडसावून सांगितले आहे.