16 आमदार अपात्र झाले तरी सरकार पडणार नाही; अजितदादांनी गणितच मांडलं

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील सत्तासंघर्षांवर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल केव्हाही जाहीर होऊ शकतो. शिंदे गटाचे 16 आमदार अपात्र ठरल्यास शिंदे- फडणवीस सरकार कोसळेल असा दावा महाविकास आघाडीचे नेते करत आहेत. मात्र विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मात्र वेगळंच मत मांडलं आहे. शिंदेंच्या शिवसेनेचे १६ आमदार जरी अपात्र ठरले तरी त्यांचे सरकार पडणार नाही असा मोठा दावा करत त्यांनी राजकीय गणितच मांडलं. अजित पवारांच्या अशा विधानाने पुन्हा एकदा चर्चाना उधाण आलं आहे.

आज नागपूर येथे महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा होणार आहे. त्यापूर्वी प्रसारमाध्यमांशी बोलताना अजित पवारांनी म्हंटल की, आत्ता भाजपकडे अपक्ष पकडून 115 आमदार आहेत. एकनाथ शिंदे यांच्याकडे 40 आमदार आणि 10 अपक्ष आहेत. म्हणजे त्याच्याकडे एकूण 165 आमदारांचा आकडा आहे. यामधील जरी 16 अपात्र ठरले तरी त्यांच्याकडे 149 आमदारांचे संख्याबळ राहत आहे. त्यामुळे 16 आमदार अपात्र झाले तरी हे सरकार पडणार नाही अस मत अजित पवारांनी व्यक्त केलं.

16 आमदार अपात्र झाल्यास विधानसभेतील संख्याबळ 288 वरून 272 वर येईल. अशावेळी सत्तास्थापनेसाठी 137  चा आकडा लागेल त्यामुळे सरकार कोसळणार नाही हीच वस्तुस्थिती आहे आणि आपण ती मान्य केली पाहिजे असेही अजित पवार म्हणाले. एकीकडे शिवसेना खासदार संजय राऊत हे सरकार कोसळणार असं म्हणत आहेत, दुसरीकडे काँग्रेस नेतेही आमदारांच्या अपात्रतेनंतर शिंदे- फडणवीस सरकार पडेल असा दावा करत असतानाच अजित पवारांच्या या विधानाने महाविकास आघाडीत खरंच सगळं ओके आहे की नाही असा प्रश्न निर्माण होत आहे.