हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्याकडून आज सिल्लोडमध्ये दौरा केला जाणार आहे. आदित्य ठाकरे हे अकोलामध्ये दाखल झाले असून त्यांच्याकडून सिल्लोडमधील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन भेट घेतली जाणार आहे. ठाकरेंच्या या दौऱ्यावरून शिंदे गटाकडून निशाणा साधण्यात आलेला आहे. “राज्यात सत्ता होती तेव्हा झोपा काढत होते आणि सत्ता गेल्यानंतर शेतकऱ्यांच्या भेटी-गाठी घेताहेत, अशा आशयाचे बॅनर्स सध्या औरंगाबाद येथे शिंदे गटातर्फे लावण्यात आले आहेत.
एकीकडे आदित्य ठाकरे यांच्याकडून दौरा केला जात असताना दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र डॉ. श्रीकांत शिंदे यांची सिल्लोडमध्ये जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. तरीही आजच्या दौऱ्यावेळी आदित्य ठाकरे नेमकं काय बोलणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आदित्य ठाकरेंच्या आजच्या दौऱ्यावरून मात्र शिंदे गटाकडून बॅनरबाजी करत निशाणा साधण्यात आला आहे. ठाकरेंचे तयार केलेल्या बॅनरवर दोन फोटो लावण्यात आलेले आहेत. एकीकडे आदित्य ठाकरे सत्तेच्या खुर्चीवर झोपले असून त्यांना शेतकरी साहेब उठा शेतकरी संकटात आहे अशी विनंती करताना दिसत आहे. तर दुसरीकडे सत्ता गेल्यानंतर आदित्य ठाकरे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्याला हात जोडून समस्या विचारताना दिसत आहेत, असे बॅनर श्रीकांत शिंदे यांच्या सभास्थळी लावण्यात आले आहेत.