हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एकनाथ शिंदे यांच्या सोबत शिवसेनेच्या तब्बल 40 आमदारांनी बंडखोरी करत भाजपसोबत सत्तास्थापन केलं. मात्र आमदारकी टिकवण्यासाठी या बंडखोर गटाला कोणत्या तरी दुसऱ्या पक्षात विलीन व्हावं लागेल अस म्हंटल जात आहे. त्यांच्यासमोर राज ठाकरे यांचा मनसे आणि बच्चू कडू यांचा प्रहार या 2 पक्षांचा पर्याय आहे. याच पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना विचारले असता त्यांनी स्पष्टपणे आपली प्रतिक्रिया व्यक्त करत शिंदे गटाकडून प्रस्ताव आला तर मी नक्की विचार करेन, असं म्हटलं आहे.
राज ठाकरे यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी सध्याच्या राजकीय परिस्थिती वर भाष्य करत विविध विषयांवर आपलं मत मांडले. शिंदे गटातील आमदार माझे जुने सहकारी आहेत. याआधी त्यांनी माझ्यासोबत काम केलं आहे. त्यामुळे जर शिंदे गटाने मनसे पक्षात विलीन व्हायचा प्रस्ताव दिला तर आम्ही विचार करु, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. पण माझ्यासाठी सर्वात आधी माझा महाराष्ट्र सैनिक असेल आणि बाकी सगळे नंतर असतील, असेही राज ठाकरेंनी स्पष्ट केले.
दरम्यान, या मुलाखतीत त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वर सडकून टीका केली. उद्धव ठाकरे हा माणूस विश्वास ठेवण्यासारखा नाही. तो माणूस बोलतो वेगळं आणि करतो वेगळं. आख्ख्या देशाला, महाराष्ट्राला माहिती नाही, इतक्या जवळून उद्धव ठाकरे आपल्या माहिती असल्याचा दावा राज ठाकरे यांनी केला.