हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । छत्रपती शिवाजी महाराजांचे पराक्रम आणि स्वराज्याप्रती त्यांचं असलेल प्रेम हे अनेकांना प्रेरणा देणारे आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा जगभर पसरला आहे. उद्या बुधवार १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती साजरी होणार आहे. मात्र शिवजयंतीचा उत्सव हा फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर न्यूयॉर्कमध्ये देखील साजरा करण्यात आला. छत्रपती फाऊंडेशन अमेरिकेत गेली ७ वर्षे शिवजयंती साजरी करत आहेत. यंदा भारत सरकारचे वाणिज्य दूतावास आणि अल्बानी ढोल ताशा ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने न्यूयॉर्क शहरातील भारतीय दूतावासात शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून छत्तीसगड राज्याचे मुख्यमंत्री भुपेश बाघेल उपस्थित होते. छत्तीसगड आणि विदर्भ हे एकाच बेरार प्रांताचे भाग होते आणि आजही मोठ्या प्रमाणात मराठी भाषिक छत्तीसगडमध्ये राहतात असे सांगत महाराष्ट्रासोबत सामाजिक नाळ असल्याचे मुख्यमंत्री बाघेल यांनी सांगितले.
तसेच सातासमुद्रापार इतक्या मोठया प्रमाणावर शिवजयंती साजरी केल्याबद्दल त्यांनी छत्रपती फाऊंडेशन व कॉन्स्युलेट ऑफ इंडिया इन न्युयॉर्क यांचे कौतुक केले. यावेळी उपस्थितांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा गौरव केला. यानिमित्त कलाकारांनी शिवजन्म, शिवराज्यभिषेक असे एक ना अनेक डोळ्यांचे पारणे फिटवून टाकणारे प्रयोग सादर केले. सोबत सांस्कृतिक संगीताची मेजवानी ही सादर करण्यात आली.