कराडला 23 एप्रिल ते 3 मे शिव महोत्सवाचे आयोजन : विनायक पावसकर

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

कराड शहरात हिंदू एकता समितीच्यावतीने 23 एप्रिल ते 3 मे या दरम्यान शिव महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. कोरोनामुळे दोन वर्ष शिवजयंती साजरी करता आली नाही. मात्र, चालू वर्षी विविध कार्यक्रम, उपक्रम व स्पर्धा राबविण्यात येणार असून शिव महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार असल्याचे जेष्ठ माजी नगरसेवक विनायक पावसकर यांनी सांगितले.

कराड येथील शासकीय विश्रामगृहात ते आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी चंद्रकांत जिरंगे, राहूल यादव, गणेश पाटील- सुपनेकर यांच्यासह हिंदू एकता समितीचे पदाधिकारी व सभासद उपस्थित होते. यावेळी शिव महोत्सव विविध उपक्रमांनी साजरा केला जाणार असल्याची माहिती दिली. तसेच राज्यस्तरीय चित्रकला, रांगोळी व निबंध स्पर्धा राबविणार असल्याचे सांगण्यात आले. स्त्रियांच्यासाठी मेळावा व बाईक रॅली काढण्यात येईल. आर्किटेक्चर यांच्या डिझाईनच्या स्पर्धा राबविण्यात येणार आहेत.

विनायक पावसकर म्हणाले, छ. शिवाजी महाराज यांचा इतिहास मोठा आहे. हिंदू एकता समिती ही कोणत्याही राजकीय पक्षाची नाही. शिव महोत्सावत अनेक ऐतिहासिक गोष्टीचा सहभाग असणार आहे. चित्ररथ हे सामाजिक व ऐतिहासिक संदेश देणार असणार आहेत. चित्ररथ स्पर्धेत पहिले ठराविक नंबर येणाऱ्या रथासोबत सहभागी चित्ररथांनाही प्रोत्साहनपर बक्षीसे देण्यात येणार आहेत. तेव्हा शिवप्रेमींनी या महोत्सवात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.