हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे 40 आमदार असल्याचा दावा करण्यात येत आहे. दरम्यान, या बंडखोर आमदारांविरोधात शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. नुकतेच सेनेकडून संबंधित आमदारांना पत्र पाठवण्यात आले आहे. आमदारांनो सायंकाळी पाच वाजेपर्यंत वर्षावर होणाऱ्या बैठकीला हजर रहा, अन्यथा कारवाईला तुम्हाला सामोरे जावे लागेल, असा थेट इशाराच पत्राद्वारे देण्यात आला आहे.
विधिमंडळ पक्षाचे मुख्य प्रतोद सुनिल प्रभू यांनी नुकतेच शिवसेनेचे नेते तथा आमदार शंभूराज देसाई यांच्यासह तर चाळीस बंडखोर आमदारांना पत्राद्वारे व्हीप जारी केला आहे. या पत्रात त्यांनी म्हटलंय की, राज्यात पक्षांतर घडवून सरकारला अस्थिर करण्याचा प्रयत्न होत असल्याने राजकीय परिस्थिती लक्षात घेता याला सामोरे जाण्यासाठी वर्षा बंगल्यावर (आज) 22 जून 2022 रोजी सायंकाळी 5 वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीस आपली उपस्थिती आवश्यक आहे.
या बैठकीस आपण उपस्थित न राहिल्यास आपण स्वच्छेने शिवसेना पक्षाच्या सदस्यत्व सोडण्याचा तुमचा इरादा स्पष्ट आहे असे मानले जाईल. परिणामी आपणावर भारतीय संविधानातील सदस्यांच्या अपात्रते संदर्भात असलेल्या तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल अशी नोंद घ्यावी, असा इशारा पत्रातून देण्यात आला आहे.