हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रात मोदी महाराष्ट्र शिंदे या जाहिरातबाजीनंतर भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत चांगलीच ठिणगी पेटली आहे. या जाहिरातीनंतर भाजप खासदार अनिल बोंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विखारी टीका करत त्यांची तुलना बेडकाशी केल्यानंतर आता शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी बोंडे याना प्रत्युत्तर देत थेट भाजपची औकातच काढली आहे. बाळासाहेब नसते तर तुमची काय औकात असती असा घणाघात संजय गायकवाड यांनी केला आहे.
संजय गायकवाड म्हणाले, एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे आमदार 50 वाघ आहेत आणि शिवसनेच्या या आमदारांमुळेच भाजपाच्या मंत्र्यांना मंत्रिमंडळात स्थान आहे. मुख्यमंत्र्यांचे काम जनतेला पटत असेल आणि जनता वाहवा करत असेल तर ते कटू सत्य पचविण्याची ताकत राजकीय नेत्यांनी ठेवायला पाहिजे . एकनाथ शिंदे चांगलं काम करत असताना त्यांना बेडकाची उपमा देणं किंवा ठाण्यापुरते मर्यादित आहे का? असं म्हणण्यापूर्वी तुम्ही आधी किती मर्यादित होता याचा विचार करा. बाळासाहेब ठाकरेंचं बोट पकडून तुम्ही मोठे झालाय नाहीतर तुमची काय औकात होती असं म्हणत संजय गायकवाड यांनी भाजपवर प्रहार केलाय.
अनिल बोंडे नेमकं काय म्हणाले होते?
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत, भाजपनेही त्यांना स्वीकारलं आहे पण त्यांचे सल्लागार त्यांना चुकीचे सल्ले देत असतील. बेडूक कितीही फुगला तरी हत्ती बनत नाही. ठाणे म्हणजे पूर्ण महाराष्ट्र नाही, ज्याप्रमाणे उद्धव ठाकरे यांना मुंबई म्हणजेच संपूर्ण महाराष्ट्र वाटायचा. तसेच, एकनाथ शिंदेंना आता ठाणे म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र वाटत आहे. पण ठाणे म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र नाही असं म्हणत अनिल बोंडे यांनी एकनाथ शिंदेंवर जहरी टीका केली होती.