नाशिक प्रतिनिधी | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना शिवसेनेत प्रवेश देणार नाही, अशी स्पष्ट भूमिका खासदार संजय राऊत यांनी घेतली आहे. येवला येथे ते बोलत होते. यावेळी त्यांनी नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेवरही मत मांडलं. राणेंना भाजपमध्ये प्रवेश द्यावा किंवा नाही हा त्यांचा विषय आहे. त्यांच्या भाजप प्रवेशाला आमचा विरोध नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येवला मतदारसंघातील शिवसेना नेते आणि पदाधिकाऱ्यांनी संजय राऊत यांची भेट घेतली. यावेळी राऊत बोलत होते . येवला येथील शिवसैनिकांनी भुजबळ यांना पक्षात प्रवेश देऊ नये, अशी मागणी त्यांनी राऊत यांच्याकडे केली.
त्यावर भुजबळ यांना शिवसेनेत घेणार नाही, असं आश्वासन त्यांनी पत्रकार परिषदेत शिवसैनिकांना दिले आहे . मी आहे तिथे बरा आहे असं भुजबळांनी काल सांगितल्यानं त्यांच्या प्रवेशाबाबतचं चित्र स्पष्ट झालं आहे, असंही ते म्हणाले. तसेच कॉग्रेस आणि राष्ट्रवादीमधून अनेक नेते शिवसेनेत येण्यास इच्छुक आहे . त्यामुळे सगळ्यांना पक्षात घ्यायला आमच्याकडे काही वॉशिंग मशीन नाही. आम्ही पारखून नेत्यांना पक्ष प्रवेश देत आहोत.