हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लखीमपूर खेरी प्रकरण आणि 12 खासदारांच्या निलंबनावरुन आज शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारवर हल्ला चढवला. “लखीमपूर खिरीची लढाई अजून संपलेली नाही. ही लढाई अजूनही सुरूच राहील. एका मंत्र्याच्या मुलाने शेतकऱ्यांना चिरडले. हे कृत्य सर्व जगाने पाहिले आहे. पण पंतप्रधान आणि गृहमंत्र्याने ही घटना पाहिली नाही. या प्रकरणी एसआयटीचा रिपोर्ट आला. तुम्ही एसआयटी स्थापन केली. तुमचीच एसआयटी आहे. आमच्या कितीही खासदारांना निलंबित करा, आम्ही तुम्हाला प्रश्न विचारणार आहोत, असा इशारा राऊत यांनी दिला आहे.
लखमीपूर हिंसेप्रकरणी काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेसह सर्व विरोधी पक्षांनी आज दिल्लीत संसदेबाहेर लाँग मार्च काढला. यावेळी शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले की, उद्या संसदेचं अधिवेशन संपणार आहे. केंद्रीय मंत्र्याच्या नेत्याच्या मुलानं शेतकऱ्यांना चिरडले. मात्र, नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी पाहिलं नाही. त्यांनीच नेमलेल्या एसआयटीच्या अहवालाला ते मान्य करण्यास तयार नाहीत.
आमच्या महाराष्ट्र्रात जर येऊन देशाचे गृहमंत्री अमित शहा आम्हाला प्रश्न विचारत असतील तर तुमच्याच राज्यात तुमच्या नाकाखाली खून, हत्या होत आहेत. त्यावर तुम्ही कारवाई करत नाही. त्याकडे लक्ष देत नाही. तुम्ही दुर्लक्ष केलं तरी विरोधक म्हणून आम्ही तुम्हाला वारंवार प्रश्न विचारत राहणार आहोत. पुढच्यावेळी 50 काय आमच्या सर्वांना निलंबित करा. पण आम्ही गप्प बसणार नाही. वारंवार प्रश्न हे करतच राहू. राजीनामा घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही, असा इशारा यावेळी राऊत यांनी दिला.