आगामी निवडणुकीतील पराभवाच्या भितीमुळेच काळे कायदे मागे घेण्याचा निर्णय; संजय राऊतांची मोदींवर टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | देशातील शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने वादग्रस्त असलेले तीन कृषी कायदे मागे घेणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केली. मोदी यांच्या निर्णयावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधत टीका केली. “पंतप्रधान मोदी यांनी आज पहिल्यांदा सात वर्षात देशातील जनतेचा आवाज ऐकला आहे. पहिल्यांदा त्यांनी मन की बात ऐकली. त्यांनी जर एक वर्षापूर्वीच ऐकले असते तर अनेक शेतकऱ्यांचे जीव वाचले असते,” असे मोदी यांनी म्हंटले आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज मी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, सुमारे पाचशेहून अधिक शेतकऱ्याना गेल्या दीड वर्षात जीव गमवावे लागले आहेत. पंजाब, हरियाणातील शेतकरी तीन कृषी कायदे तसेच काळे कायदे याविरुद्ध संघर्ष व आंदोलन करतोय. सरकारची भूमिका पहिल्यापासून आठमुठीपणाची होती. काही झाले तरी शेतकऱ्यांपुढे झुकणार नाही, काही झाले तरी शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करणार नाही.

लखीमपूरमध्ये आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना चिरडून मारण्यात आले. त्यांच्यावर लाठ्याकाठ्या वापरण्यात आल्या. त्याठिकाणी प्रचंड दबावाचे राजकारण करण्यात आले. शेतकऱ्यांना आतंकवादी, पाकिस्तानी, खलिस्तानी अशा प्रकारच्या बाधा देण्यात आल्या. पण शेतकऱ्यांनी जी भूमिका घेतली ती इतकी परखड आणि अतिशय स्पष्ट होती. त्यांच्या भूमिकेपाठोपाठ देशातील शेतकऱ्यांच्या भावनाही राहिल्या. आणि शेवटी आता त्याचा विजय झाला आहे. आज पंतप्रधानांना तीन काळे कायदे मागे घ्यावे लागले, असे संजय राऊत म्हणाले.