हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पश्चिम बंगालच्या भवानीपूर पोटनिवडणुकीत भाजप आणि तृणमूल काँग्रेस या दोन्ही पक्षात जोरात लढत होत आहे. या ठिकाणी दोन्ही पक्षांनी आपली ताकद पणाला लावली आहे. येथील निवडणुकीत ममता बॅनर्जीं यांच्या विजयाबाबत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विश्वास व्यक्त केला आहे. “ममतांना हरवण्यासाठी भाजपने 80 नेत्यांना मैदानात उतरवलं असलं तरीही ममता बॅनर्जी रेकॉर्ड ब्रेक मतांनी जिंकणारच,” असे राऊतांनी म्हंटले आहे.
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की,” भवानीपूर विधानसभा पोटनिवडणुकीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या उभ्या राहिलेल्या आहेत. या मतदारसंघात सकाळपासून मतमोजणीला सुरुवात करण्यात आलेली आहे. मात्र, येथील निवडणुकीत ममतांच्या विजयाबाबत काळजी करण्यासारखे काहीच नाही. येथील निवडणुकीत त्या नक्की विजयी होतील आणि भवानीपूरमध्ये सर्वांचे डिपॉझिट जप्त होईल हे नक्की.
भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जी रेकॉर्ड मोठ्या मतांनी विजयी होतील. भवानीपूर हा त्यांचा परंपरागत गड आहे. मागच्या वेळेला दुसऱ्या मतदारसंघात त्या आव्हान स्विकारून लढल्या होत्या. त्याची याचिका कोर्टात आहे. पण ममता दीदी जिंकतील. त्यांना विजयाच्या आमच्याकडून शुभेच्छा आहेत. त्यांच्या विजयाबाबत काळजी करण्याचे कारण नसल्याचे राऊत यांनी म्हंटले आहे.