स्वप्न बघायला काही हरकत नाही; कोल्हेंच्या विधानावर फडणवीसांचा टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अजित पवार यांना महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झालेलं बघायचं असून कार्यकर्त्यांनी हीच भावना मनात ठेवून अजितदादांच्या मागे ताकद उभा करावी असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी केल्यानंतर याबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना विचारलं असता त्यांनी प्रतिक्रिया देत अमोल कोल्हे यांना टोला लगावला आहे.

अजितदादांच्या मुख्यमंत्रिपदाविषयी कुणी स्वप्न पाहायला काही हरकत नाही. स्वप्न कुणीही पाहू शकतं. परंतु या तिन्ही पक्षात समन्वय नाही हे मी आधीपासून सांगत आलोय. त्यांच्या मधील समन्वयाच्या अभावमुळे त्यांच्या-त्यांच्यामध्येच अडचणी निर्माण होतायत, अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी केली.

अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले-

आदरणीय शरद पवार साहेब यांना देशाचे पंतप्रधान आणि अजित पवार यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होताना आपल्याला बघायचं आहे. आता आपण सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी दादांना काहीतरी देण्याची वेळ आली आहे. त्या नेतृत्वाकडून आणखी अपेक्षा करण्यापेक्षा त्या नेतृत्वाला आणखी बळ देण्याची गरज आहे, असंही अमोल कोल्हे म्हणाले.