हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : महागाईच्या विषयावरून काँग्रेसकडून मोदी सरकारवर निशाणा साधण्यात आलेला होता. त्यानंतर आता शिवसेनेकडून सामनातून मोदींवर हल्लाबोल करण्यात आलेला आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी “देशातील बिघडलेली अर्थव्यवस्था, वाढत असलेली महागाई याबाबत केंद्र सरकार काहीच करीत नसल्याचे दिसते. या त्रासातून जनतेला बाहेर काढण्याऐवजी ते हातावर हात धरून बसले आहेत. त्यामुळे सामान्यांचा श्वास त्यात गुदमरत आहे. अर्थात, त्याची पर्वा कोणाला आहे का?,” असा सवाल करीत पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल केला आहे.
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पेगासस विषयावरून मोदींवर घणाघाती टिकाही केली होती. त्यानंतर आता वाढत्या महागाईवरून त्यांनी मोदींवर निशाणा साधला आहे. राऊतांनी म्हंटले आहे की, “आपल्या देशात कोरोनाचे प्रमाण कमी होत असले तरी महागाईचे प्रमाण दिवसें दिवस वाढतच आहे. पेट्रोल-डिझेलच्या दरांनी शंभरी पार केली आहेच, आता विनाअनुदानित घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत 25 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.
सध्या गॅस दरवाढीचा पुन्हा भडका उडालेला आहे. घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलिंडरही महाग झाल्याने विकत घ्यायच्या खाद्यपदार्थांच्या किमतीतही वाढ होणार, असा दुहेरी मार सामान्य माणसाला खावा लागणार आहे. हे सर्वसामान्यांना काही नवीन नाही. या वर्षाच्या सुरुवातीपासूनच हा पेट्रोल-डिझेल आणि गॅस दरवाढीचे सूत्र सुरु आहे. त्यामुळे मोदीसरकारने यावर नियंत्रण आणणे गरजेचे असल्याचे मत खासदार राऊत यांनी व्यक्त केले आहे.