हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिवसेनेत सध्या वाद सुरु आहे. याअगोदर राऊत यांनी अग्रलेखाचा माध्यमातून राणेंवर हल्लाबोल केला आहे. दरम्यान राणेंनी केलल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर त्याचे भाजपने समर्थन केले होते. त्यावरून राणेंवर राऊतांनी टीका केली आहे. राणेंनी बेताल बडबडीमुळे महाराष्ट्राची समीकरणे बदलणार नसल्याची टीका राऊतांनी केली आहे.
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज एकीकडे काँग्रेसचे मोठेपण तर दुसरीकडे मंत्री राणे व भाजपवर निशाणा साधला आहे. राऊतांनी म्हंटले आहे की, एका गुजरात निवडणुकीच्या वेळी मणिशंकर अय्यर यांनी नरेंद्र मोदी यांचा उल्लेख ‘नीच’ असा करताच भाजपने मोठाच हल्लाबोल केला. मणिशंकर यांच्या ‘नीच’ शब्दाची गांभीर्याने दखल घेऊन काँग्रेसने अय्यर यांना पक्षातून निलंबित करण्याची हिंमत व नैतिकता दाखविली. नारायण राणे यांनीही तोच गुन्हा केला, पण भाजप त्यांना सरळ पाठीशी घालत आहे.
राणेंबद्दल राऊतांनी म्हंटले आहे की, राणे यांना राजकीय मर्यादा आहेत. त्यांचे सर्वात मोठे भांडवल म्हणजे ते बोलताना, वागताना मर्यादांचे भान ठेवीत नाहीत. या बेताल बडबडीमुळे महाराष्ट्राची राजकीय समीकरणे बदलण्याची सुतराम शक्यता नाही. उलट या सगळय़ांचे परिणाम भाजपास भोगावे लागतील, असेही राऊतांनी म्हंटले आहे.