सीबीआय, ईडी माझ्यापर्यंत पोहोचू शकलं नाही, बदलाच्या भावनेतून गुन्हा दाखल – संजय राऊत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल दिल्लीत भाजपाच्या महिला मोर्चाच्या राष्ट्रीय सचिव दीप्ती रावत यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान याबाबत राऊतांनी प्रतिक्रिया दिली असून सीबीआय, ईडी, इनकम टॅक्स माझ्यापर्यंत पोहोचू शकलं नाही, बदल्याच्या भावनेतून माझ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे राऊत यांनी सांगितले.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिल्लीत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपकडून तक्रार दाखल करण्यात आल्याने याबाबत अधिक माहिती दिली. यावेळी राऊत म्हणाले, “मी ज्या शब्दाचा वापर केला त्याचा अर्थ मुर्ख आणि बुद्धू असा आहे. सरकार आणि मान्यताप्राप्त शब्दकोषांमध्ये त्या शब्दाचा अर्थ आहे. मोठ्या साहित्यिकांनी त्याचा अर्थ सांगितला आहे. माझ्या विरोधात दिल्लीत तक्रार दाखल करण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्रालय दिल्ली पोलिसांचं नियंत्रण करते. सीबीआय, ईडी, इनकम टॅक्स माझ्यापर्यंत पोहोचू शकलं नाही. माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

बदल्याच्या भावनेतून आणि राजकीय बदल्याच्या भावनेतून माझ्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. महाराष्ट्रात तुम्ही काही करु शकत नाही. यंत्रणा माझ्या विरोधात बोलू शकत नाहीत. हे अशा प्रकारचे हातखंडे वापरून आमच्या विरोधात एफआयर दाखल केली जाते. मी त्यांना सांगू इच्छितो की ही शिवसेना आहे त्यांनी लक्षात ठेवावे.

सध्या संसदेचं सत्र सुरु आहे. माझ्यावर एफआयर दाखल करुन दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जातोय. दोन्ही राजकीय पक्षात युती आघाडीसंदर्भात चर्चा सुरु असतात, मात्र सध्या दोन्ही पक्षात यासंदर्भात कोणतीही चर्चा झाली नाही, असं संजय राऊत म्हणाले. भाजपा कार्यकर्त्यांविषयी अपशब्द वापरल्याने राऊत यांच्याविरोधात भाजपाच्या महिला मोर्चाच्या राष्ट्रीय सचिव दीप्ती रावत यांनी तक्रार दाखल केली होती. संजय राऊत यांनी माफी मागावी, अशी मागणी दीप्ती रावत यांनी केली आहे.

Leave a Comment