त्रिपुराचे पडसाद महाराष्ट्रात उमटण्याचे काय कारण? रझा अकादमी हे भाजपचेच पिल्लू; संजय राऊत यांची टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । त्रिपुरामध्ये मस्जिद पाडल्याच्या कथित घटनेचा निषेध करीत अमरावतीमध्ये 15 ते 20 हजार लोक मोर्चा काढत रस्त्यावर उतरले आहेत. या मोर्चाला आता हिंसक वळण प्राप्त झाले असून अमरावतीतील अनेक दुकानांची तोडफोड करण्यात आली आहे. यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. त्रिपुराचे पडसाद महाराष्ट्रात उमटण्याचे काय कारण? रझा अकादमी हे भाजपचं पिल्लू आहे, अशी टीका राऊत यांनी केली आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, महाराष्ट्रात ज्या रझा अकादमी संघटनेद्वारे हे लोण पसरवलं जातंय, त्यामागे कोणता पक्ष आहे, हे सर्वांना माहिती आहे. अनेक वर्षांपासून या संघटनेला भाजपच्यावतीने खतपाणी घातले जात आहे. आज महाराष्ट्रात सुरु असलेल्या जाळपोळ आणि दंगलींमागे कोण आहे? हे यावरून स्पष्ट होते. रझा अकादमी हे भाजपचेच पिल्लू आहे. त्यामुळे त्यांच्याच पाठिंब्याने त्रिपुरातले लोण आता महाराष्ट्रापर्यंत पोहचलेले आहे.

या दंगलीमागे कोणत्या पक्षाचा हात आहे हे सर्व जनतेला माहिती आहे. अन्यथा तिकडे त्रिपुरात घडलेल्या दंगलींचे पडसाद या ठिकाणी पडण्याचे काय कारण? असा सवालही यावेळी राऊत यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान त्रिपुरामध्ये जमावाने मशिद पाडल्याची अफवा महाराष्ट्रात पसरली. त्याच्या निषेधार्थ काल विविध ठिकाणी मोर्चे काढले गेले. त्याचे पडसाद अमरावती, नांदेड, भिवंडी या ठिकाणीही उमटले आहेत.