देशाचा अपमान करणाऱ्या कंगनाने थोडी जरी लाज असेल तर माफी मागावी; संजय राऊतांची टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । “भारताला 15 ऑगस्ट 1947 साली स्वातंत्र्य मिळाले नव्हते, ती भीक होती. देशाला खरे स्वातंत्र्य 2014 मध्ये मिळाले’’, वादग्रस्त वक्तव्य अभिनेत्री कंगना राणावत हिने एका कार्यक्रमात केले. यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी कंगना राणावत आणि भाजपावर निशाणा साधला आहे. “कंगनाने देशाचा अपमान केला आहे. तिच्या या वक्तव्यामुळे भारतीयांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यामुळे तिने थोडी जरी लाज लज्जा असेल तर देशाची माफी मागावी. तिचे सर्व राष्ट्रीय पुरस्कार परत घेतले जावेत,” असे राऊत यांनी म्हटले.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी म्हणाले, ज्या देशाने कंगनाला पुरस्कार दिले आहेत. त्याच कंगनाने देशाचा अपमान केला आहे. संबंध देशातून आता कंगनाला देण्यात आलेले सर्व पुरस्कार हे घेण्यात यावेत, अशी मागणी केली जात आहे. अनेक स्वातंत्र्यसैनिकांना स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झाल्याबद्दल ताम्रपट देण्यात आलं आहे. मग काय ही ताम्रपट भिकाऱ्यांना दिली? भाजपाला यावर भूमिका स्पष्ट करावी लागेल.

सध्या महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांवर सीबीआय, इडी, आयकर विभाग अशा पद्धतीने धाडी टाकत आहेत, जसे की ते भाजपाचे नोकर असावेत, अशी टीकाही यावेळी राऊत यांनी केली आहे.