हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून भाजप व शिवसेना या दोन्ही पक्षांतील नेत्यांमध्ये वादावादी होताना दिसून येत आहे. दोन्ही पक्षांतील नेते एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षांनाच लाच प्रकरणात एसीबीने थेट पालिकेत अटक केल्याने याबाबत शिवसेना खासदार संजय राऊतांनी भाजपाला खडे बोल सुनावले आहेत. त्यांनी “भाजपाची अवस्था म्हणजे मी नाही त्यातली आणि कडी लावा आतली अशी झाली आहे,” असा खोचक टोला लगावलेला आहे.
पिंपरी चिंचवड पालिकेत एसीबीच्या घडलेल्या प्रकारामुळे राऊतांनी भाजपवर चांगलाच निशाणा साधला आहे. शहरात “भाजपाची अवस्था म्हणजे मी नाही त्यातली आणि कडी लावा आतली अशी झाली आहे. या पक्षाला मिळेल त्या मार्गाने पैसे कमावण्याचे म्हणजे भ्रष्टाचाराचे कधीच वावडे नव्हते. हेच लोक ऊठसूट मुंबई पालिकेवर निशाणा साधीत असतात. पण स्वत:च्या खुर्चीखाली काय जळतंय त्याचा मात्र त्यांना विसर पडतो. एखाद्या शहराची पुरती इज्जत काढणे म्हणजे काय, ते पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत घडलेल्या प्रकारावरून समजते, असे म्हटले आहे.
दरम्यान, खासदार संजय राऊत यांच्याकडून सामनातून दररोज भाजपचा समाचार हा घेतला जातोय. आज पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षांनाच लाच प्रकरणात एसीबीने थेट पालिकेत अटक केल्याच्या घटनेवरून राऊतांनी भाजपवर घणाघाती टीका केली आहे.