हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आज 22 वा वर्धापन दिन आहे. त्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी संवाद साधला यावेळी बोलताना शरद पवार यांनी अनेक मुद्यांवर भाष्य केलं. राज्यातील महाविकास आघाडी सरकार हे पाच वर्षे टिकेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.
सरकार पाच वर्षे टिकेल
यावेळी बोलताना ते म्हणाले, आपण राज्याला वेगवेगळ्या विचारांचे सरकार दिलं शिवसेना आणि आपण एकत्र काम करू शकतो असं कोणाला पटलं नसतं पण आपण लोकांना पर्याय दिला आणि त्यांनी तो स्वीकारला. तिन्ही पक्षांनी योग्य पावले टाकली आणि आज हे आघाडी सरकार चांगल्या रीतीने काम करत आहेत. असं कौतुक शरद पवार यांनी यावेळी केले. सरकार झाल्यानंतर किती दिवस टिकणार अशी चर्चा सुरू होती. अशी आठवण करुन देताना ‘हे सरकार टिकेल आणि पाच वर्षे टिकेल’ असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. एवढंच नाही तर पुढे बोलताना ते म्हणाले “हे सरकार टिकेल आणि पाच वर्षात काम करेल नुसतच काम करणार नाही तर लोकसभा आणि विधानसभा एकत्रित काम करून सामान्य जनतेचे देशात आणि राज्यात प्रतिनिधित्व करण्याचं काम करेल याबाबत शंका नाही” असं शरद पवार यांनी सांगितलं.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली या भेटीवरून विरोधकांनी टीकेचा सूर उमटवला होता. त्यालाही प्रत्युत्तर शरद पवार यांनी दिले आहे यावेळी बोलताना ते म्हणाले, ‘शिवसेनेसोबत आपण कधी काम केलं नाही पण महाराष्ट्र शिवसेनेला सुद्धा कित्येक वर्षांपासून पाहतो आहे. माझा या संबंधीचा अनुभव विश्वास असणाराच आहे. ज्या वेळी जनता पक्षाचे राज्य आले व त्यानंतरच्या कालखंडात निवडणुकीत सगळीकडे कॉंग्रेसचा पराभव झाला असताना काँग्रेसला पाठिंबा देण्यासाठी एक राजकीय पक्ष पुढे आला तो म्हणजे शिवसेना. नुसता पुढे झाला नाही तर या निवडणुकीत इंदिरा गांधींना मदत करण्यासाठी शिवसेनेचा एकही उमेदवार विधानसभा निवडणुकीत उभा राहणार नाही असा निर्णय घेण्यात आला. पक्षाचा नेता असा निर्णय घेतो तुम्ही विचार करा, पण त्याची चिंता कधी बाळासाहेबांनी केली नाही. त्यांनी इंदिरा गांधींना दिलेला शब्द निवडणूक न लढवता पाळला त्यामुळे कुणी काहीही शंका घेतली तरी शिवसेनेला ज्या पद्धतीने त्या कालखंडात भक्कमपणाची भूमिका घेतली आहे तीच भूमिका सोडण्या संबंधित कोणी सांगत असेल तर तसं होणार नाही’ असा विश्वासही शरद पवार यांनी यावेळी व्यक्त केला.