दहिवडी | शिवसेनेचे पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या आदेशानुसार दहिवडी येथील नगरपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत सर्वच्या सर्व 17 जागा लढविण्यात येणार आहे. दहिवडीचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी व विकासकामांचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी आपण या वेळी शिवसेनेच्या माध्यमातून पॅनेल टाकत असल्याची माहिती माण-खटावचे शिवसेना नेते व जिल्हा बँकेचे संचालक शेखर गोरे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली.
पत्रकात म्हटले आहे की, ”दहिवडी ग्रामपंचायतीवर आपल्या नेतृत्वाखाली निर्विवाद वर्चस्व स्थापित केले होते. दहिवडीत आपल्याला मानणारा मोठा गट असून, शिवसेनेच्या माध्यमातून या गटाच्या पाठीशी मोठी ताकद उभी करणार आहे. नगरपंचायतीच्या या निवडणुकीत शिवसेना सर्व 17 जागांवर उमेदवारी अर्ज भरणार असून, या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी आपण स्वत: लक्ष घालून जबाबदारी घेणार आहे.”
दहिवडी हे तालुक्यातील आपल्याकडे काही दिवसच ग्रामपंचायत असताना आपण ग्रामपंचायतीचा चेहरामोहरा बदलला होता. मात्र, ग्रामपंचायतीची नगरपंचायत झाल्यानंतर आपल्या हातून सत्ता गेली. नगरपंचायतींना मोठा निधी येऊनही विरोधकांना दहिवडीचा विकास करता आला नाही. विरोधकांनी या नगरपंचायतीचा फक्त पदापुरता वापर करत सत्ता भोगल्याचीही टीका शेखर गोरे यांनी केली.