सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
शिवसेना म्हणून आम्ही भूमिका जाहीर केली होती, त्यामध्ये महाविकास आघाडीचे सरकार राज्यात आहे. त्याप्रमाणे महाविकास आघाडीचे प्रतिबिंब जिल्हा बॅंकेत दिसावे, तसे संकेत राष्ट्रवादीच्या राज्यस्तरीय नेत्यांनी दिले होते. मात्र ऐनवेळी काय झाले ते माहित नाही. यापुढे शिवसेना आपली भूमिका स्वतंत्रपणे घेणार आहे. केवळ बहुमत आहे, जास्त मतदार आहे म्हणून एकतर्फा निर्णय कुठला पक्ष घेणार असेल तर शिवसेनेला सर्व मार्ग मोकळे असल्याचे म्हणत राष्ट्रवादीला गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी इशारा दिला आहे.
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीसाठी बुधवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस हाेता. पाटण सोसायटी गटातून राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई आणि राष्ट्रवादीचे युवा नेते सत्यजीत पाटणकर यांच्यात काेणीच उमेदवारी अर्ज मागे न घेतल्याने त्या दाेघांत निवडणुक हाेणार असल्याचे स्पष्ट झाले. याविषयी आज दि. 11 रोजी गुरूवारी मंत्री शंभूराज देसाई यांना शिवसेनेला देखील मार्ग माेकळे असल्याचे म्हटले.
शंभूराज देसाई म्हणाले, शिवसेनेला आमचे मार्ग माेकळे आहेत. आगामी काळातील सर्व निवडणुका शिवसेना स्वतंत्र पद्धतीने लढेल त्याबाबतचे धाेरण ठरविले जाईल. जिल्हा बॅंकेची आता निवडणुक हाेईल. ती निमित्त आहे. यापुढे जिंकण्यासाठी शिवसेना लढेल. परंतु या पुढं शिवसेना निश्चित धाेरण ठरवत वाटचाल करील.