हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : काल मध्य प्रदेशातील चित्रकूट या ठिकाणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे चिंतन शिबीर पार पडले. या शिबिरात संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी महत्वाची व मोठी घोषणा केली. ती म्हणजे मुस्लिम मोहल्ल्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखा निर्माण करायच्या तसेच आयटी सेल स्थापन करायचे. भागवत यांनी केलेल्या घोषणेवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे. “परिवर्तन चांगलं आहे. पण संघ इतका का बदलतोय याचा विचार झाला पाहिजे,” असे राऊत यांनी प्रतिक्रिया देताना म्हंटल आहे.
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी अनेकवेळा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यपद्धतीवर टीका केली आहे. तर कधी त्यांनी संघाच्या चांगल्या कार्याचे कौतुकही केले आहे. काल संघाचे सरसंघचालक भागवत यांनी केलेल्या घोषणेवर माध्यमांनी त्यांच्याकडे विचारणा केली आता राऊत यांनी आज प्रतिक्रिया दिली. यावेळी राऊत म्हणाले कि, “राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये चांगल्या प्रकारे बदल होत आहे. संघाकडून बदल करीत असताना परिवर्तनावर जास्त भर दिला जात आहे. पण संघ इतका का बदलतोय? याचाहि विचार करणे महत्वाचे आहे. संघाने स्वतःला बदलायचे ठरवले असेल तर त्याकडे एक प्रयोग म्हणून पाहिले पाहिजे,” असे राऊत यांनी म्हंटल आहे.
मुस्लिम मोहल्ल्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखा निर्माण करण्याच्या निर्णयावर राऊत पुढे म्हणाले कि, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून आतापर्यंत इतकी वर्षे केवळ हिंदू राष्ट्रांची संकल्पना मांडण्याचे काम केले जात होते. मतांसाठी धार्मिक विभाजन आणि फाळणी करण्याचे काम केले. त्यामध्ये मोठ्या संख्येने हिंदू व मुस्लिम समाजातील लोकांचे बळी गेले. आता जर संघाकडून चांगला निर्णय घेत परिवर्तन केले जात असेल आणि त्यातून जर देशाच्या एकटा आणि अखंडतेला मजबुती, बळ मिळत असेल तर संघ इतका का बदलतोय? याबाबत विचार केला पाहिजे, अशी प्रतिक्रिया राऊत यांनी दिली.