शिवाजी विद्यापीठाच्या बाळासाहेब देसाई अध्यासनासाठी १ कोटीचा निधी देणार- उदय सामंत

0
40
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर
शिवाजी विद्यापीठाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त मंजूर करण्यात आलेल्या बाळासाहेब देसाई अध्यासनासाठी १ कोटी रूपयांचा निधी लवकरच वितरित करण्यात येईल, अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज येथे दिली. शिवाजी विद्यापीठाच्या नॅनो सायन्स व तंत्रज्ञान विभागाच्या सभागृहात आज मंत्री श्री.सामंत यांनी शिवाजी विद्यापीठाच्या अनुषंगाने आढावा बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते.

उदय सामंत म्हणाले, सन २०१० पासून राज्यातील विविध विद्यापीठांमध्ये स्थापन झालेल्या अध्यासनांचा आढावा घेऊन ती सुरळीत चालण्याच्या दृष्टीने त्यांना आर्थिक सहाय्य करण्याचे धोरण शासनाने स्वीकारले आहे. त्यानुसार शिवाजी विद्यापीठाच्या बाळासाहेब देसाई अध्यासनासाठी १ कोटी रूपये देण्यात येतील. त्या निधीचा विनियोग विद्यार्थीहित लक्षात घेऊन कशा प्रकारे करणार, त्याचे नियोजन करून प्रस्ताव सादर करण्याची सूचनाही त्यांनी केली.

शासन आणि विद्यापीठे वेगळी नसून एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याचे सांगून सामंत म्हणाले, शासन आपल्या स्तरावरून विद्यापीठांची काळजी वाहात असताना विद्यापीठांनीही आपले उत्तरदायित्व योग्य प्रकारे सांभाळणे आवश्यक आहे. यापुढील कालखंडात उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या सचिवांसमवेत प्रत्यक्ष विद्यापीठात जाऊन विद्यापीठे व संस्थाचालक यांच्या विविध प्रस्तावांवर समोरासमोर चर्चा करून ते मार्गी लावण्याचे धोरण अवलंबण्यात येईल, जेणेकरून त्यांचा मंत्रालयात खेटे घालण्याचा त्रास कमी होईल. त्याचप्रमाणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधण्यात येईल.

विद्यापीठामधील विविध प्रकल्पांसाठी जिल्हा नियोजन मंडळाकडून ५ वर्षांच्या कालावधीत साधारणत: १० कोटी रूपयांच्या निधीची तरतूद करता येईल का, या दृष्टीनेही विचार करावा, अशी सूचनाही त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केली. शिवाजी विद्यापीठ हे राज्यातील एक अग्रणी विद्यापीठ असून येथील ‘फॅकल्टी डेव्हलपमेंट सेंटर फॉर सायबर सिक्युरिटी अँड डाटा सायन्सेस’चे राष्ट्रीय संस्थेत रूपांतर करण्याच्या दृष्टीने विद्यापीठाने सर्वसमावेशक स्वरूपाचा प्रस्ताव सादर करावा, अशी सूचना सामंत यांनी कुलगुरू डॉ.देवानंद शिंदे यांना केली.

प्रायव्हेट सॅटेलाईट आणि टीचर्स ट्रेनिंगचा पायलट प्रोजेक्ट

कुलगुरू डॉ.देवानंद शिंदे यांनी इस्त्रो आणि आय.आय.टी. (मुंबई) यांच्या सहकार्याने शिवाजी विद्यापीठाचा स्वत:चा खाजगी सॅटेलाईट विकसित करण्याचा मानस असल्याचे मंत्री उदय सामंत यांना सांगितले. त्यावर, हा चांगला उपक्रम असून त्यासंदर्भात आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यात येईल, असे सांगितले. तसेच, शिवाजी विद्यापीठाने आपल्या कार्यक्षेत्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतील प्रत्येकी पाच महाविद्यालये निवडून त्याठिकाणी सॅटेलाईट अगर नेटवर्कच्या माध्यमातून टीचर्स ट्रेनिंगचा पायलट प्रकल्प राबविण्याच्या दृष्टीने तयारी करावी, अशी सूचना त्यांनी केली. यावेळी प्र-कुलगुरू डॉ.डी.टी.शिर्के यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. कुलगुरू डॉ.शिंदे, प्र-कुलगुरू डॉ.शिर्के यांनी शिवाजी विद्यापीठाविषयी पॉवरपॉइंट सादरीकरण केले. कुलसचिव डॉ.विलास नांदवडेकर यांनी आभार मानले. बैठकीला आमदार ऋतुराज पाटील यांच्यासह कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई, पोलिस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण संचालक डॉ.धनराज माने उपस्थित होते.

दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here