हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| शिवाजी विद्यापीठाला सरकारकडून 35 कोटीचा निधी मिळणार असल्याची मोठी बातमी समोर आली आहे. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी काही दिवसांपूर्वीच शिवाजी विद्यापीठाला निधी देण्याबाबत सरकारकडे मागणी केली होती. या मागणीला विचारात घेऊनच लवकरच विद्यापीठाला 35 कोटींचा निधी देण्यात येईल अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.
शुक्रवारी पुण्यामध्ये अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीचे महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये अजित पवार यांनी तातडीने येत्या अर्थसंकल्पात शिवाजी विद्यापीठाला निधी समाविष्ट करण्याबाबत वित्त विभागाच्या मुख्य सचिवांना सूचना दिल्या. या सूचनानंतर आता विद्यापीठाला निधी मिळण्याबाबतचा मार्ग मोकळा झाला आहे.
शिवाजी विद्यापीठाच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त विविध शैक्षणिक उपक्रम राबवण्यासाठी 50 कोटींचा निधी देण्यात येईल अशी घोषणा अजित पवारांनी गेल्या अनेक वर्षांपूर्वी केली होती. परंतु कोरोना आणि अनेक कारणांमुळे हा निधी वितरित करण्यात आला नाही. मुख्य म्हणजे मंजूर झालेल्या पन्नास कोटींमधील 16 कोटी दहा लाख रुपये आत्तापर्यंत विद्यापीठाला देण्यात आले आहेत. परंतु वरित निधी देखील लवकरच मिळावा अशी मागणी हसन मुश्रीफ यांनी केली होती. या मागणीनंतरच अजित पवार यांनी उर्वरित निधी ही लवकर वितरित करण्याची ग्वाही दिली आहे.
निधीचा वापर कोठे करण्यात येईल?
सरकारकडून देण्यात येणारा निधी स्कूल ऑफ नॅनो सायन्स अँड बायोटेक्नॉलॉजीच्या मुख्य इमारतीसाठी आणि मुलांचे वसतिगृह बांधण्यासाठी करण्यात येईल. तसेच यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रूरल डेव्हलपमेंट, राजर्षी छत्रपती शाहू रिसर्च सेंटर अँड म्युझियम कॉम्प्लेक्ससाठी देखील या निधीचा वापर करण्यात येईल. याबरोबर, कन्व्हेन्शन सेंटर, युवा विकास केंद्र, गोल्डन ज्युबिली फॅकल्टी हाऊस, लोकनेते बाळासाहेब देसाई अध्यासन ही कामे देखील या निधीच्या मार्फत करण्यात येतील.