हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | शिवडी-न्हावाशेवा सागरी सेतू खुला करण्याच्या चर्चा मागच्या अनेक दिवसापासून सुरु होत्या. आता या मार्गाचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे नवीन वर्षात म्हणजेच येत्या 12 जानेवारीला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यास हिरवा झेंडा दाखवणार आहेत. नवीन झालेल्या मार्गावर टोल किती आकारला जाईल याची चिंता वाहनचालकांना होती. मात्र आता याबाबत पडदा उठला आहे. कारण आता शिवडी-न्हावाशेवा सागरी सेतूसाठी 250 रुपयांचा टोल आकारला जाणार आहे. याबाबत राज्य सरकारने निर्णय घेतला आहे.
आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत अनेक मोठे निर्णय घेण्यात आलेत. यातीलच एक निर्णय म्हणजे शिवडी-न्हावाशेवा सागरी सेतूसाठी प्रवाशांना 250 रुपये टोल भरावा लागेल. 2018 मध्ये या महाप्रकल्पाच्या कामाला सुरुवात झाली होती. खरं तर हा मार्ग 2022 मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, करोना महामारीमुळे प्रोजेक्ट पूर्ण व्हायला उशीर झाला. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितल्यानुसार, या सागरी सेतू साठी 500 रुपयांचा टोल आकारला जाणार होता. परंतु सरकारने तो 250 रुपये केला.
शिवडी-न्हावाशेवा सागरी सेतूच्या निर्मितीमुळे मुंबई ते अलिबाग हे अंतर अवघ्या पंधरा ते वीस मिनिटांत पार होणार आहे. या मार्गाच्या निर्मितीसाठी जागतिक पातळीवरील तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. त्यामुळे हा मार्ग पर्यावरणाला पूरक असा आहे. या सागरी सेतूमुळे मुंबई, नवी मुंबई, रायगड, मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग आणि मुंबई-गोवा महामार्ग हें अंतर केवळ 15 मिनिटात पार केले जाणार आहे. तसेच नवी मुंबई आणि रायगडमधील प्रदेशाचा आर्थिक आणि भौतिक विकास होणार आहे. त्याचबरोबर मुंबई विमानतळाच्या दळणवळणाची सुविधा वृद्धिंगत होणार आहे. हा सागरी सेतू 22 किलोमीटरचा असून 18 किलोमीटर हा समुद्रातून आहे. या प्रकल्पासाठी 21 हजार 200 कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे .