सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
ज्यांना औरंगजेबाचे उदात्तीकरण करायचे आहे त्यांनी महाराष्ट्र सोडावा. छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर करण्यात आलेल्या आंदोलनावेळी ज्यांनी ज्यांनी हे कृत्य केले आहे त्यांच्या विरोधात देशद्रोहाचे गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी भाजप आमदार तथा छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
शिवेंद्रराजे भोसले यांनी आज सातारा येथे माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी छत्रपती संभाजीनगर येथे एमआयएमच्या वतीने करण्यात आलेल्या आंदोलनावेळी वापरण्यात आलेल्या औरंगजेबाच्या फेटोच्या घटनेचा निषेध व्यक्त केला. यावेळी शिवेंद्रराजे म्हणाले की, छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएमच्या आंदोलनावेळी औरंगजेबाचे फोटो दाखवण्यात आले.
या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करत आहे. ज्या औरंगजेबाने लाखो लोकांची कत्तल महाराष्ट्रात केली. देवदेवतांची मंदिरे फोडली. आणि ज्या औरंगजेबाच्या जुलमी राजवटीच्या विरोधामध्ये आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी जो लढा उभा केला. अशा औरंगजेबाचे महाराष्ट्रामध्ये जयजयकार केले जात असेल तर हि निंदनीय गोष्ट आहे.
छत्रपती संभाजी नगरमध्ये औरंगजेबाचे फोटो झळकवणाऱ्यांवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करा : शिवेंद्रसिंहाराजे भोसलेंची राज्य सरकारकडे मागणी pic.twitter.com/ExMjBv9VuQ
— santosh gurav (@santosh29590931) March 6, 2023
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्रातील जनतेच्या वतीने माझी विनंती आहे की, अशा लोकांवर कडक कार्यवाही या सर्व प्रकारावर केली जावी. ज्यांनी हा प्रकार केला आहे त्यांच्यावर देशद्रोहाचे गुन्हे दाखल केले जावे. अशा लोकांना औरंगजेब जर आवडत असला तर त्यांनी महाराष्ट्र सोडून तिकडे जावे या ठिकाणी राहण्याची गरज नाही. राज्य शासनानेही महाराष्ट्रातील मराठी माणसांच्या भावनांची दखल घेऊन ताबडतोब कार्यवाही करावी, अशी मागणी करत आहे.