Sunday, January 29, 2023

शहांनी सहकार क्षेत्राची सूत्रे हाती घेतल्याने कोणाचा थरथराट वगैरे होण्याचे कारण नाही; सामनातून अमित शहांचे कौतुक?

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मोदी सरकारने केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार करताना प्रथमच सहकार खात्याची निर्मिती केली. तसेच या नव्याने स्थापन केलेल्या सहकार मंत्रालयाची (Ministry of Co-operation) जबाबदारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे देण्यात आली आहे. दरम्यान अमित शहा सहकार मंत्री झाल्यानंतर राज्यातील काँग्रेस राष्ट्रवादी साठी हा धक्का मानला जात असल्याची चर्चा माध्यमांमध्ये झळकू लागल्या होत्या. यावर शिवसेनेने आपल्या सामना अग्रलेखातुन भाष्य करत चक्क अमित शहा यांचे कौतुक केले आहे.

गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे सहकार मंत्रालयाचा कार्यभार आल्यामुळे अनेकांच्या मनात विचारांचे तरंग निर्माण झाले आहेत. शहा यांच्याकडे सहकार खाते आल्याने या क्षेत्रावर आकाश कोसळेल असे भय निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. श्री. शहा हे महाराष्ट्रासारख्या राज्यातील सहकार क्षेत्राच्या नाडया आवळतील, अनेक प्रकरणे खणून काढतील, काँग्रेस राष्ट्रवादीचे सहकारातील जे प्रमुख लोक आहेत त्यांच्या मागे चौकशांचा ससेमिरा लावतील व त्यातून महाराष्ट्रासारख्या राज्यात भाजप सरकारची स्थापना सहकारातून करतील असे जे बोलले जात आहे ते शहा यांची बदनामी करणारे आहे असे सामनातून म्हंटल आहे.

- Advertisement -

महाराष्ट्र व गुजरात हे सहकाराचे दोन बालेकिल्ले आहेत व श्री. शहा हे मूळचे सहकार क्षेत्रातील कार्यकर्ते आहेत नंतर ते राजकारणात आले. सहकार क्षेत्रातील जाण त्यांना असल्यामुळे त्यांच्याकडे ही जबाबदारी दिली असावी असे वाटते, अशी पुरवणी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी आता दिली आहे. त्यात काही चुकीचे आहे असे वाटत नाही पंतप्रधान मोदी यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाची फेररचना नुकतीच केली. त्यात सहकार मंत्रालयाची स्थापना नव्याने केली हे खाते सहकार क्षेत्रातील कोणत्या तज्ञाला मिळणार? असा प्रश्न अनेकांना पडला होता, पण हे खाते गृहमंत्री अमित शहाच्या ताब्यात गेले. श्री शहा याना सहकार खात्यात काही सुधारणा करायच्या आहेत. म्हणजे नक्की काय करायचे आहे ते लवकरच दिसेल असे शिवसेनेने म्हंटल.

ग्रामविकास व सहकार ही तळागाळाशी जोडलेली खाती आहेत व त्या माध्यमातून लोकांना मदत करता येते हे महाराष्ट्र व गुजरातमध्ये दिसले आहे. गृहखाते हा ‘थँकलेस जॉब’ आहे. त्यामुळेच सहकार क्षेत्रातून लोकांपर्यंत पोहोचावे, असा विचार गृहमंत्र्यांनी केला असेल तर कोणाला चलबिचल होण्याची आवश्यकता नाही. गुजरातमधील अनेक सहकारी बँका, सहकारी संस्थांशी अमित शहा यांचा संबंध आहे. त्यामुळे सहकार क्षेत्राचा विकास तसेच वाढ याबाबत शहा यांनी काही नवे करायचे ठरविले असेल तर त्यांचे स्वागतच करायला हवे असेही शिवसेनेने म्हंटल.

सहकाराबाबतचे कायदे राज्याच्या विधानसभेत केलेले असतात. त्यात केंद्राला हस्तक्षेप करता येत नाही. घटनेनुसार हा राज्य सरकारचा विषय आहे. सहकार क्षेत्राशी उलटसुलट वर्तन करणे म्हणजे लाखो शेतकरयांच्या पोटापाण्याशी खेळण्यासारखे आहे. मोदीच्या नेतृत्वाखाली सहकार क्षेत्राला अधिक बळ देण्याचा विचार आहे, असे नव्या सहकार मंत्र्यांनी म्हणजे गृहमंत्री अमित शहांनी सांगितले. सहकार क्षेत्र जगविणे, टिकविणे, त्यास बळ देणे हे केंद्राचे कर्तव्यच आहे. केंद्रीय गृहमंत्र्यांनी सहकार क्षेत्राची सूत्रे हाती घेतल्याने कोणाचा थरथराट वगैरे होण्याचे कारण नाही. श्री. अमित शहा हे सहकार चळवळीतलेच कार्यकर्ते आहेत. नव्या सहकार मंत्र्यांचे स्वागत करायला काय हरकत आहे? असेही शिवसेनेने म्हंटल.