काय सांगावे, चंद्रकांतदादा उभे असते तर जयश्री जाधवांच्या मतांचा आकडा लाखावरही गेला असता

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीने दणदणीत विजय मिळवत भाजपला धूळ चारली. मी या निवडणुकीत उभा असतो तर महाविकास आघाडीचे काय झालं असत असा उलट सवाल भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केल्यानंतर शिवसेनेनं आपल्या सामना अग्रलेखातून भाजप आणि चंद्रकांत पाटील यांच्या वर जोरदार टीका केली आहे. काय सांगावं, चंद्रकांत पाटील कोल्हापूर निवडणूकीत उभे असते तर जयश्री ताईंना लाखांहून अधिक मते मिळाली असती असा चिमटा शिवसेनेनं काढला.

कोल्हापूर उत्तर विधानसभा काँगेसच्या जयश्री जाधव यांनी जिंकली आहे. आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली. तेथे त्यांच्या पत्नीच महाविकास आघाडीच्या उमेदवार होत्या. 97,332 मते मिळवून त्या विजयी झाल्या. या मतदारसंघात भाजप उमेदवार सत्यजित कदम यांना मिळालेली 78,025 मते दुर्लक्षित करण्यासारखी नाहीत. भारतीय जनता पक्षाने ही जागा प्रतिष्ठेची केली होती. त्यांचे प्रांताध्यक्ष चंद्रकात पाटील यांच्या होम ग्राऊंडवर ही पोटनिवडणूक होती. या पोटनिवडणुकीत स्वतः चंद्रकांत पाटील उतरतील व कुस्ती खेळतील असा कयास होता. “कोल्हापुरात एखादी पोटनिवडणूक झाली तर मी ती लढवीन व जिंकून येईन” असे आव्हान पाटलांनी दिले होते, पण प्रत्यक्ष पोटनिवडणूक लागताच ते गायब झाले अस शिवसेनेनं म्हंटल.

चंद्रकांत पाटील यांचे आता म्हणणे असे की, “सत्यजित कदम उभे राहिले तर महाविकास आघाडीला हा असा घाम फुटला. प्रत्यक्ष मी उभा राहिलो असतो तर काय झाले असते त्याचा विचार करा.” पाटील यांचे बोलणे गांभीर्याने घ्यावे असे नाही. ते काही लोकनेते नाहीत व कोल्हापूरच्या राजकीय परंपरेचा वारसा काय आहे याविषयी त्यांना ज्ञान नाही.

मागच्या निवडणुकीत पाटील कोल्हापुरातून कोथरूडला गेले व निवडून आले. तेथेही निवडून येताना त्यांना काय घाम फुटला होता ते महाराष्ट्राने पाहिले. म्हणजे पाटील आता त्या अर्थाने कोल्हापूरचे राहिलेले नाहीत. त्यामुळे ते निवडणुकीस उभे राहिले असते तर वेगळे चित्र दिसले असते या बेडक्या फुगविण्यात अर्थ नाही. पाटील उभे राहिले असते तर काय सांगावे, जयश्री जाधवांच्या मतांचा आकडा लाखावरही गेला असता अस म्हणत शिवसेनेनं चंद्रकांत पाटलांवर टीका केली.

Leave a Comment