शिवसेनेचा मुख्यमंत्री झाल्यापासून भाजपची अवस्था वाघाला पाहून भेदरलेल्या मेंढरांसारखी; राऊतांचा घणाघात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून आणि शिवसेनेचा मुख्यमंत्री झाल्यापासून कळपात वाघ शिरल्यावर मेंढरांची जशी अवस्था होते तशी अवस्था भारतीय जनता पक्षाची झाली आहे अशा शब्दांत शिवसेनेनं आपल्या सामना अग्रलेखातुन भाजपवर निशाणा साधला आहे. तसेच त्या सगळ्यांना चोख उत्तर देण्यासाठी महाराष्ट्राला शमीच्या झाडावरील शस्त्र 15 आता काढावीच लागतील असेही शिवसेनेने म्हंटल.

दोन वर्षांपासून महाराष्ट्रात ‘ठाकरे’ सरकार काम करीत आहे. हे सरकार नीट चालू नये म्हणून दिल्लीश्वरानी मोठा खटाटोप आणि आटापिटा चालवला आहे. खोटेपणाची सर्व आयुधे वापरून सरकारच्या पाठीत घाव घालण्याची एकही सघी राजकीय विरोधकांनी सोडली नाही. त्या सगळ्यांना चोख उत्तर देण्यासाठी महाराष्ट्राला शमीच्या झाडावरील शस्त्र 15 आता काढावीच लागतील. महाराष्ट्राला कमजोर करायचे, महाराष्ट्राचा स्वाभिमान, अभिमान मोडून काढायचा हे दिल्लीचे धोरणच आहे, पण या बेईमान धोरणाची पालखी वाहणारे सूर्याजी पिसाळ आजही महाराष्ट्रात निपजत आहेत व महाराष्ट्राला याच दुश्मनांपासून सगळ्यात जास्त धोका आहे अशी टीका शिवसेनेने केली आहे.

महाविकास आघाडीत शिवसेनेसारखा हिंदुत्वाचा पाठीराखा पक्ष सामील झाल्याने भारतीय जनता पक्षाचा बुरखाच फाटला आहे. शिवसेनेचे विचार व शिवसेनेच्या भीतीने ते भुई थोपटत सुटले आहेत. एरवी मराठी माणसाला पाण्यात पाहणारे, मराठी माणसाच्या बाबतीत शत्रुत्वाची भूमिका घेणारे, बेळगावात मराठी माणूस हरला म्हणून महाराष्ट्रात पेढे वाटणारे हे ढोंगी आज मुंबईत ‘मराठी कट्टे’ सजवीत आहेत. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी सुरू असलेल्या या ढोंगबाजीचा मुखवटाही मराठी माणूस ओरबाडून काढल्याशिवाय राहणार नाही असे म्हणत शिवसेनेनं मुंबई भाजपला फटकारले आहे.

शिवसेना हा एक ज्वलंत विचार आहे. सदैव उसळणारा ज्वालामुखीच आहे. शिवसेनेमुळे राजकीय विरोधकांची झोप उडाली असून त्यांना मोगलांच्या घोडयाप्रमाणे जळी-स्थळी शिवसेनाच दिसू लागली आहे. ही वाताहत पाहून आम्हाला या मंडळींची कीव करावीशी वाटते. विचारांचे सोने लुटा, महाराष्ट्राच्या स्वाभिमानाशी शत्रुत्व करू नका असे त्यांना सांगण्याचीच सोय नाही. महाराष्ट्र हा अमृताचा कुंभ आहे. विचारांची खाण आहे. शौर्याचे तेज आहे. शमीच्या झाडावरची शस्त्र याच संपत्तीच्या रक्षणासाठी आहे. महाराष्ट्राचे मन शुद्ध आहे. आजच्या विजयादशमीला त्याच शुद्ध विचारांची सुवर्णपाने वाटूया आणि लुटूया! अस सामनातुन म्हंटल.

Leave a Comment