हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पुण्यात येऊन शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. तसेच युतीच्या मुद्द्यावरून देखील त्यांनी शिवसेनेला जबाबदार धरले. या सर्व पार्शवभूमीवर शिवसेनेने आपल्या सामना अग्रलेखातून शहांच्या विधानाचा खरपुस समाचार घेत भाजपवर हल्लाबोल केला आहे. शिवसेनेच्या हाती सत्याची नखे असून दगाबाजी हा शब्द शिवसेनेच्या शब्दकोशात नाही अशा शब्दात सामनातून भाजपवर पलटवार करण्यात आला आहे
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे एक मस्त गृहस्थ आहेत. श्री. शहा मस्त असले तरी त्यांचे महाराष्ट्रातील चेले हे महामस्त आहेत. मदमस्त असा उल्लेख करणे त्या मंडळींना असंसदीय वाटू शकेल. त्यामुळे महामस्तच बरे. श्री. शहा यांनी पुण्यात येऊन त्यांच्या कार्यकर्त्यांना बुस्टर डोस दिला. त्यावर लगेच महाराष्ट्रातील महामस्त पुढाऱ्यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची भाषा सुरू करून हास्यजत्रेची रंगीत तालीमच सुरू केली. काही झाले की राष्ट्रपती राजवट लावण्याची धमकी द्यायची. देशाचे घटनात्मक प्रमुख जणू त्यांच्या घरीच रबर स्टॅम्प घेऊन बसले आहेत. तर श्री. अमित शहा यांनी पुण्यात येऊन राज्य सरकारवर काही प्रश्न उपस्थित केले व शिवसेनेलाही इशारे, आव्हाने वगैरे देऊन ते गेले.
देशाची एकंदरीत स्थिती आज बरी नाही. अनेक राज्यांत कायद्याची घडी विस्कटलेली आहे. ईशान्येकडील राज्यांत, जम्मू-कश्मीरात गृहमंत्र्यांनी विशेष लक्ष देण्याची आवश्यकता आहे. पण त्यांचे लक्ष्य महाराष्ट्रावरच दिसते. महाराष्ट्रात एकंदरीत बरे चालले असल्याचे हे लक्षण मानायला हवे. म्हणूनच फक्त शिवसेनेला आव्हान देण्याचे वक्तव्य त्यांनी केले आहे.
शिवसेनेचा इतिहास समोरून लढण्याचा आहे. दगाबाजी हा शब्द शिवसेनेच्या शब्दकोशात नाही. शाह म्हणतात, त्याप्रमाणे शिवसेनेला ऐकायला अडचण आहे की नाही हे साडेअकरा कोटी जनता ठरवेल, पण देशाची जनता महागाई, बेरोजगारीविरुद्ध आक्रोश करीत असताना केंद्रातील सरकारने मात्र कानांत ‘बोळे’च घातले आहेत.शिवसेनेला एकटे लढून वगैरे दाखवण्याची पोकळ आव्हाने देण्यापेक्षा लडाखमध्ये घुसलेल्या चिन्यांशी लढून दाखवा व त्यांना बाहेर ढकलण्याचे आव्हान स्वीकारा. तेच देशहिताचे आहे. कश्मीरातही रक्तपात, सैनिकांचे बलिदान सुरूच आहे. देशाच्या गृहमंत्र्यांना राजकारणातच ‘रस’ असल्याने देशाचे शत्रू आत घुसून आव्हान देणारच! असे शिवसेनेनं म्हंटल.