हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजपच्या देणगी अभियानावर शिवसेनेनं सामना अग्रलेखातून जोरदार टीका केली आहे. देश बलाढ्य करण्याची युक्ती भाजपाच्या तिजोरीत अडकून पडली आहे हे नव्यानेच समजले, असा खोचक टोला लगावत देणगीच्या पावत्या फाडल्यानं देश बलाढ्य होईल का? असा सवाल शिवसेनेने केला आहे.
भारतीय जनता पक्षाने जनतेकडे देणगीसाठी आवाहन केले आहे. अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त भाजपकडून देणगी हे अभियान सुरू करण्यात आले. पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री शहा वगैरेंनी पक्षाला प्रत्येकी एक हजार रुपयांची देणगी देऊन पैसे दिल्याची पावती सोशल मीडियावर झळकवली आहे. मोदी-शहांनी देणगीची पावती समाज माध्यमांवर फडकवताच पक्षाचे इतर नेते, मंत्री, लोकप्रतिनिधी वगैरे बडय़ा मंडळींनीही पक्षनिधीच्या पावत्या फाडल्या. पक्षासाठी अथवा राजकीय कार्यासाठी देणग्या घेणे यात अजिबात गैर नाही.
देश बलाढ्य करण्याची युक्ती भाजपच्या तिजोरीत अडकून पडली आहे हे नव्यानेच समजले . कालपर्यंत वाटत होते असंख्य हुतात्मे , स्वातंत्र्यवीर , महात्मा गांधी , पंडित नेहरू , सरदार पटेल , इंदिरा गांधी , डॉ.आंबेडकर यांच्यासह मेहनत करून घामाचे शिंपण करणारे लोक, शास्त्रज्ञ, सैन्य यांच्यामुळे आपला देश बलाढय़ होत जाईल , पण हे सर्व कुचकामी असून भाजपच्या देणगीच्या पावत्या फाडल्याने देश मजबूत होईल . यामुळे देश आणखी बलाढय़ खरंच होईल ? लडाखमध्ये घुसलेल्या चिन्यांना मारून बाहेर काढण्याचे बळ या देणग्यांतून देशाला मिळणार असेल तर देणगी मोहिमेचे स्वागत करायला हरकत नाही’, असेही सामनातून म्हंटल.
शिवसेनेशी हिंदुत्त्वाच्या मुद्यावर युती करण्यापूर्वी भाजप काय होता हे सर्वांना माहिती आहे. आता भाजप देशातील सर्वात श्रीमंत पक्ष असून त्यामुळं कुणाला दु: ख होण्याचं कारण नाही. मात्र, आता 50, 100 , 500 आणि एक हजार रुपयापर्यंतच्या देणग्या गोळा करण्याचं मायाजल टाकलंय. लोकवर्गणीवर पक्ष उभा असल्याचा दिखावा भाजपला करायचा असल्याचा टोला शिवसेनेनं लगावला आहे.