हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एसटी कर्मचाऱ्यांना भडकवणारे वकील गुणारत्न सदावर्ते यांच्या अडचणीत वाढ झाली असून त्यांचे अनेक गैरव्यवहार पोलिसांच्या हाती लागले आहेत. येवडच नव्हे तर सदावर्ते यांच्या घरी पैसे मोजण्याची मशीन सापडल्याचे वकिलांनी कोर्टात सांगितले. या संपूर्ण प्रकरणावर शिवसेनेनं आपल्या सामना अग्रलेखातून सदावर्ते वर टीकेची झोड उठवली आहे. लाल परी मुक्त झाली पण गाढवांचे काय?? या मथळ्याखाली शिवसेनेनं सदावर्तेवर टीका केली आहे.
नेमकं काय आहे सामना अग्रलेखात-
गुणरत्न सदावर्ते त्याच्याच कर्माची फळे भोगत तुरुंगात पडला आहे. अनेक जिल्हय़ांत त्याच्याविरुद्ध गुन्हे दाखल झाल्याने या महाशयांची गावभर वरात काढली जात असल्याचे चित्र दिसत आहे. एक मात्र नक्की, सदावर्तेची वरात निघाल्यापासून एस.टी. वेगात सुरू झाली आहे व आतापर्यंत 75 हजार एस.टी. कर्मचारी डयुटीवर रुजू झाले आहेत. सदावर्तेच्या झुंडशाहीस चार महिने आधीच लगाम घातला असता तर एस.टी. संप इतका चिघळला नसता. गुणरत्न सदावर्तेच्या अनेक सुरस आणि चमत्कारिक कहाण्या आता बाहेर पडू लागल्या आहेत. सदावर्ते व त्याच्या माफिया टोळीने एस.टी. कामगारांकडून कोटय़वधी रुपये गोळा केले. कामगारांना देशोधडीस लावून स्वतःचे खिसे भरणारे सदावर्तेसारखे पुढारी म्हणजे माणुसकीचे शत्रूच आहेत. अस शिवसेनेनं म्हंटल आहे.
पोलिसांनी सदावर्तेच्या घरातून पैसे मोजण्याची मशीन जप्त केली आहे. पैसे मोजण्याची मशीन घरात ठेवावी असा कोणता धंदा या महाशयांनी सुरू केला होता? वकिलीतून इतका पैसा मिळावा की, ते मोजायला यंत्र लागावे? एस.टी. कामगारांना उल्लू बनवून जमा केलेल्या पैशांची मोजदाद करायला ही मशीन सदावर्तेकडे होती. सदावर्तेने संपकाळात काही मोठय़ा मालमत्ता खरेदी केल्या. सदावर्ते ज्या परळ भागातील इमारतीत राहत होता ती जागादेखील संशयास्पद व्यवहारातून, बेकायदेशीरपणे ताब्यात घेतल्याचे सिद्ध झाले आहे.
सांगलीतील मंगळसूत्र चोरांची टोळी व सदावर्ते टोळीची युती झाली आणि त्यांना नागपूरचा अज्ञात आशीर्वाद लाभला असल्याचा रिपोर्ट आहे. सदावर्तेसारख्या लोकांना हाताशी धरून कष्टकरी वर्गात असंतोष निर्माण करणे राज्याच्या हिताचे नाही. पाच वर्षे राज्य चालविणाऱयांना हे शहाणपण नसावे हे वेदनादायी आहे. सदावर्ते याच्या घरात फक्त नोटा मोजण्याची मशीनच सापडली नाही, तर त्याने एक गाढवही पाळले आहे. गाढव पाळणे हे काही बेकायदेशीर नाही, पण यामुळे सदावर्ते व त्याच्या कुटुंबाच्या ‘छंद’, आवडी-निवडीची कल्पना यावी अस शिवसेनेनं म्हंटल.
‘डंके की चोट पर’ हा गुणरत्न सदावर्तेचा परवलीचा शब्द होता. आज सदावर्तेची वरात या न्यायालयातून त्या न्यायालयात, या पोलीस स्टेशनातून त्या पोलीस स्टेशनात सुरू आहे. सदावर्तेला गाढवांची आवड होती. त्याने गाढव पाळले, पण या महान गाढवप्रेमींना कोण पाळत होते हेसुद्धा लोकांसमोर यायलाच हवे. सदावर्ते जेलातून, पोलीस स्टेशनातून बाहेर येताना उदयनराजेंप्रमाणे ‘कॉलर’ उडवताना दिसतो व ‘भारतमाता की ‘जय’ अशी विजयाची खूण दाखवत गर्जना करतो. हा विनोदच आहे.
कायदा हा सामान्यांची कवचकुंडले असतो. सदावर्तेसारखे लोक कायदा आणि संविधानाचा गैरवापर करतात व सामान्यांना देशोधडीस लावतात. “कायदा गाढव असतो” अशा अर्थाची एक म्हण आहे. सदावर्तेसारखे लोक गाढवच आपल्या दारात बांधतात व मुक्या मेंढरासारखी जनता त्या गाढवाची पूजा करते. गाढव तुरुंगात जाताच ‘लाल परी’ मुक्त झाली, गावागावांत धावू लागली!