हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारताला 1947 ला भीक मिळाली होती, खरं स्वातंत्र्य तर 2014 ला मिळालं अस वादग्रस्त वक्तव्य बॉलीवूड अभिनेत्री म्हणत कंगना राणावत ने केल्यानंतर तिच्यावर सर्वच स्तरातून टीका केली जात आहे. दरम्यान, कंगनाच्या या वादग्रस्त विधानानंतर शिवसेनेनं आपल्या सामना अग्रलेखातुन जोरदार टीका केली आहे. एक आण्याची भांग घेतली तर भरपूर कल्पना सूचतात असं एकदा टिळक म्हणाले होते, कंगना रानौतला हे वक्तव्य तंतोतंत लागू पडते, अशी खोचक टीका शिवसेनेकडून करण्यात आली आहे.
स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारकांचा इतका भयंकर अपमान कधीच कोणी केला नव्हता. कंगनाने भगतसिंगांपासून वीर सावरकरांपर्यंत सगळ्यांवरच अफू-गांजाच्या नशेच्या गुळण्या टाकून त्यांना भिकारी ठरवले आहे. या वीरांचा अपमान करणाऱ्या कंगनाला सर्वोच्च अशा नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे, हे देशाचे दुर्दैव असल्याची टीका शिवसेनेनं केली आहे.
कंगनाबेन यांनी यापूर्वी महात्मा गांधींचाही अपमान केला आहे. तिचं नथुरामप्रेमही उफाळून येत असतं. तिच्या बरळण्याकडे एरवी कुणी फारसं लक्ष देत नाही. एक आण्याची भांग घेतली, तर भरपूर कल्पना सुचतात, असं एकदा टिळक म्हणाले होते. कंगनाबेनच्या बाबतीत टिळकांचं विधान तंतोतंत खरं ठरतं”, अशा शब्दांत शिवसेनेकडून कंगना रनौतवर खोचक शब्दांत टीका करण्यात आली आहे.