हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्रातले अनेक प्रकल्प व योजना गुजरातला नेऊन ठेवल्या. मुंबईचे महत्त्व कमी करायचे व महाराष्ट्राची आर्थिक रसद तोडायची हाच त्यामागचा हेतू आहे. महाराष्ट्र व गुजरात ही तशी जुळी भावंडे. सदैव एका नात्याने एकत्र राहिले. त्या नात्यात मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न आजही होतच आहे.परंतु गुजरात व्यापारी असला तरी महाराष्ट्र लढणारा आहे. महाराष्ट्र लढेल आणि महाराष्ट्र जिंकेल सुद्धा अशा शब्दांत शिवसेनेने आपल्या सामना अग्रलेखातून टोला लगावला आहे.
ज्या महाराष्ट्रानं देशाला आर्थिक प्राणवायूचा पुरवठा केला, त्या महाराष्ट्राला आज प्राणवायूचा तुटवडा जाणवतो आहे. महाराष्ट्रात काहीही करून राजकीय आणि आर्थिक गोंधळ निर्माण करून राज्य बदनाम करण्याचे कारस्थान सुरू आहे”, अशा शब्दांत शिवसेनेने केंद्र सरकार वर हल्लाबोल केला. दिल्लीतील सरकारे बदलत राहिली तरी महाराष्ट्राशी वैर काही संपलेले नाही. महाराष्ट्राच्या हक्काचे व न्याय्य वाटय़ाचे काही मिळूच द्यायचे नाही. महाराष्ट्राला ओरबडायचे, त्याची लूट करायची हे धोरण मात्र सर्व काळात कायम राहिले, असा घणाघातही शिवसेनेनं केला आहे.
संकटाशी लढण्याची मोठी परंपरा हाच महाराष्ट्राचा इतिहास आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या लढय़ात पंडित नेहरू प्रतापगडावर आले तेव्हा त्यांच्या समोर निधडय़ा छातीने महाराष्ट्र उभा राहिला होता. महाराष्ट्राने दिल्लीची फालतू गुलामी कधीच पत्करली नाही. महाराष्ट्रात मराठी बाण्याचा मुख्यमंत्री आणि सरकार असल्यामुळे दिल्लीचे आजचे पातशहा महाराष्ट्राची हरतऱ्हेने कोंडी करत आहेत. राज्यातलं लसीकरण दिल्लीच्या आडमुठेपणामुळे थांबलं आहे असा आरोप देखील शिवसेनेने केला आहे.
ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.