हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | स्टारपुत्र आर्यन खानच्या विरोधात अमली पदार्थ बाळगल्याचा, सेवन केल्याचा कोणताही पुरावा आढळला नसल्याचे निरीक्षण मुंबई हायकोर्टाने नोंदवले आहे. क्रूझ पार्टी प्रकरणात आर्यन खानच्या मोबाईलवरील संभाषणातही कटकारस्थानासंदर्भात कोणतेही पुरावे आढळले नाहीत असे म्हणत एनसीबी म्हणजे खोटे गुन्हे दाखल करून खंडणी, गाड्या- घोडे उकळणारे टोळ भैरवच अशी घणाघाती टीका शिवसेनेनं केली आहे.
आर्यनविरोधात एनसीबीच्या आरोपात तथ्य नाही, असे मुंबई उच्च न्यायालयाचे निरीक्षण असेल तर या पोरोना अडकवून खडणी उकळण्याचा प्रयत्न करणारा प्रत्येक अधिकारी गजाआड व्हायलाच हवा. एनसीबीच्या वादग्रस्त कारवायाच्या खोटेपणाचे रोज नवे पुरावे समोर येत आहेत व त्यामुळे केंद्रीय तपास यंत्रणांची प्रतिष्ठा व आदर साफ धुळीस मिळाला आहे. नाकोटिक्स कंट्रोल ब्यूरो हे महाराष्ट्रात खोटे गुन्हे दाखल करून खंडणी, गाडी-घोडे उकळणारे टोळभैरवच बनले होते. भारतीय जनता पक्षाचे लोक टोळभैरवांच्या खंडणीखोरीचे समर्थन करीत होते. एनसीबीच्या टोळीचे कारनामे पुराव्यासह समोर आणण्याचे चोख काम मंत्री नवाब मलिक यांनी केले हे महाराष्ट्रावर मोठे उपकारच झाले असे शिवसेनेनं म्हंटल.
फिल्मस्टार, त्यांची मुले, व्यापारी, राजकारण्यांचे नातेवाईक यांना अशा प्रकरणात फसवून खंडण्या उकळणाऱ्या केंद्रीय यंत्रणांच्या विरोधात महाराष्ट्रात रोष निर्माण झाला आहे व श्री. शरद पवार यांनी त्यांच्या तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत. माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या तुरुंगातील प्रत्येक दिवसाची किंमत मोजावी लागेल असे श्री. पवार यांनी फटकारले आहे. आरोप करणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग पळून गेले. त्यांचा ठावठिकाणा कोणाला माहीत नाही. सर्वोच्च न्यायालयानेच परमबीर कुठे आहेत? असा सवाल केला आहे. त्या ‘फरार’ अधिकाऱ्याच्या आरोपांवर अनिल देशमुख तुरुंगात आहेत.
लखीमपूर खिरीत आंदोलक शेतकऱ्यांना चिरडून मारणाऱ्या मंत्रिपुत्राविरुद्ध प्रचंड संताप आहे. केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत आहे, पण अजय मिश्रा यांचा राजीनामा न घेता पंतप्रधान मोदी त्या मंत्र्यांच्या मांडीस मांडी लावून बसत आहेत. हा कोणता न्याय? कायद्याचे, नियमांचे बडगे फक्त राजकीय विरोधकांना, बाकी सगळ्यांना मोकळे रान! आर्यन खान प्रकरणात ‘एनसीबी’ची इतकी दुरवस्था झाली आहे. की, मुंबईतील एनसीबीचे कार्यालय बंद करून या टोळधाडीस सक्तीच्या रजेवर पाठवायला हवे. अशा शब्दांत शिवसेनेने हल्लाबोल केला.