हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेनेचे हेवीवेट नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारत तब्बल 40 आमदारांसोबत सुरत गाठले होते. या संपूर्ण घडामोडी मुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली असून महाविकास आघाडी सरकार धोक्यात आले आहे. त्याच पार्श्वभूमीवर शिवसेनेने आपल्या सामना अग्रलेखातून शिंदेंच्या बंडावर आणि त्यांना रसद पुरवणाऱ्या भाजपवर जोरदार टीका केली आहे. संकटांशी सामना करण्याची शिवसेनेला सवय असून गुजरातच्या भूमीवरून फडफड करणाऱ्यांनी इतिहास समजून घ्यावा असा इशारा शिवसेनेने दिला.
महाराष्ट्रातील सरकारला खाली खेचण्याची एकही संधी भाजपवाले सोडत नाहीत. अडीच वर्षांपूर्वी अजित पवारांचे प्रकरण पहाटे झाले. त्यात यश आले नाही. आता तेच अस्वस्थ आत्मे एकनाथ शिंदे यांच्या मानगुटीवर बसून ‘ऑपरेशन कमळ’ घडवीत आहेत. काही करून राज्यातील सरकार घालवायचे याच ईर्षेने त्यांना झपाटलेले आहे.
महाराष्ट्रात सत्तेचा माज चालणार नाही. केंद्रीय सत्तेचा माज दाखवून महाराष्ट्रात फोडाफोडीचे राजकारण सुरू झाले आहे. आईचे दूध विकणारीं अवलाद शिवसेनेत नको, असे शिवसेनाप्रमुख नेहमी म्हणत. असे लोक शिवसेनेत निर्माण व्हावेत ही महाराष्ट्राच्या मातीशी बेइमानीच आहे. शिवसेना ही आई. तिच्या आणाभाका घेऊन राजकारण करणाऱ्यांनी आईच्या दुधाचा बाजार मांडला. त्या बाजारासाठी जागा निवडावी सुरतची. हा योगायोग समजायचा काय? असा सवाल शिवसेनेनं केला.
छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली होती व त्याच सुरतमधून आज महाराष्ट्राच्या अस्मितेवर घाव घालण्याचे प्रयोग सुरू आहेत. भारतीय जनता पक्षाच्या डोळ्यात महाराष्ट्राचे ठाकरे सरकार खुपत आहे, त्यापेक्षा जास्त शिवसेना खुपत आहे. त्यामुळे आधी शिवसेनेवर वार करा व मग महाराष्ट्रावर घाव घाला, असे राजकारण स्पष्ट दिसते.
शिवसेनेसाठी छातीचा कोट करून जो मावळा उभा राहिला त्याच्या त्यागातून भगवा झेंडा डौलाने फडकत राहिला. त्यामुळे विधान परिषदेच्या निवडणुकीत ज्यांनी माती खाल्ली त्यांना महाराष्ट्राची माती व शिवसैनिक माफ करणार नाहीत. भारतीय जनता पक्षाने सत्तेच्या राजकारणासाठी लाजच सोडली. एखाद्या राज्यात सत्ता मिळवता आली नाही म्हणून ते राज्य अस्थिर आणि डळमळीत करायचे, हेच त्यांचे धोरण आहे. माणसे फोडायची, फितुरीची बिजे रोवायची, त्या फितुरीचे पिक खडकावरही काढण्यात हे लोक पटाईत,
महाराष्ट्र जागा झाला की पेटून उठतो, हा इतिहास ईस्ट इंडिया कंपनीच्या फितूर मंडळाने लक्षात घ्यावा. महाराष्ट्रातल्या सरकारचे काय व कसे होणार, हा प्रश्न नसून महाराष्ट्रावर वार करणाऱ्यांचे, महाराष्ट्राशी बेइमानी करणाऱ्यांचे काय होणार ? फितुरीचे बीज रोवणाऱ्यांचे काय होणार? धर्माच्या मुखवट्याखाली अधर्माशी संग करणाऱ्यांना जनता माफ करील काय? हे खरे प्रश्न आहेत. संकटांशी व वादळांशी सामना करण्याची शिवसेनेला सवय आहे. गुजरातच्या भूमीवरून फडफड करणाऱ्यांनी हा इतिहास पुन्हा एकदा समजून घ्यावा! गुजरातमध्ये या मंडळींनी जरूर दांडिया खेळावा, पण महाराष्ट्रात तलवारीस तलवार भिडेल हे नक्कीच! असा इशारा शिवसेनेने दिला.