हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्रात लव्ह जिहाद कायदा करावा अशी मागणी करत विरोधी पक्ष भाजपने सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. लव्ह जिहाद कायद्याबाबत राज्य सरकारने कोणतीही भूमिका घेतली नसल्याने भाजपचे पुढारी शिवसेनेवर हिंदुत्वविरोधी अशी टीका करत आहेत. यावर आता शिवसेनेने ‘सामना’ या त्यांच्या मुखपत्राद्वारे उत्तर दिले आहे. शिवसेनेने भाजपला लव्ह जिहादबाबत बिहारमध्ये कायदा करण्याचा सल्ला दिला आहे. त्या कायद्यातील मार्गदर्शक तत्वे महाराष्ट्र सरकारला अभ्यासासाठी उपयोगी ठरतील. त्यानंतर आम्ही पाहू, अशी भूमिका शिवसेनेने घेतली आहे.एक वर्षापूर्वी पहाटे ‘लव्ह जिहाद’ झाला. तरीही महाविकास आघाडीचे सरकार आले व टिकले. ते टिकणारच आहे! असे सामना अग्रलेखात म्हंटल आहे.
काय म्हंटल आहे सामना अग्रलेखामध्ये-
अग्रलेखामध्ये म्हटले आहे की, आधी लव्ह जिहादची कायदेशीर व्याख्या ठरवावी लागेल. ही व्याख्या योगीजी किंवा शिवराजमामांनी ठरवली व देशाने स्वीकारली असे होणार नाही. बिहारात भाजपचे राज्य आहे व नितीश कुमार मुख्यमंत्री आहेत. नितीश कुमारांचा अनुभव मोठा आहे. बिहारात लव्ह जिहादविरोधी कायदा भाजप करणार असेल तर त्याच कायद्यातील मार्गदर्शक तत्त्वे महाराष्ट्र सरकारला अभ्यासासाठी उपयोगी ठरतील. एखाद्या विषयाचे वैचारिक नेतृत्व करण्याची संधी बिहारलाही मिळू द्या! काय हो, महाराष्ट्रातील भाजप पुढाऱ्यांनो, हे बरोबर आहे ना? ‘लव्ह जिहाद’च्या विषयावर बांग देऊन सरकारला हादरे देऊ, या भ्रमातूनही भाजपवाल्यांनी बाहेर पडावे. एक वर्षापूर्वी पहाटे ‘लव्ह जिहाद’ झाला. तरीही महाविकास आघाडीचे सरकार आले व टिकले. ते टिकणारच आहे!
हिंदू मुलींना मुसलमान तरुण फूस लावून पळवून नेतात. त्यांचे धर्मांतरण करून निकाह लावतात. हा हिंदुत्वावर आघात आहे. त्यास ‘लव्ह जिहाद’ असे नाव देण्यात आले. पाकिस्तान, चीनची घुसखोरी, रोज होणारे जवानांचे बलिदान, कोरोनाचे दुसऱ्या महायुद्धाप्रमाणे उसळलेले संकट, त्यातून निर्माण झालेली आर्थिक मंदीची लाट हे प्रश्न तसे गंभीर नसून ‘लव्ह जिहाद’ हेच देशासमोरचे सगळ्यात भयंकर संकट आहे व महाराष्ट्र सरकारनेही इतर राज्यांप्रमाणे ‘लव्ह जिहाद’विरोधात कठोर कायदा करावा, अशी मागणी भाजप पुढाऱ्यांनी केली आहे.
भाजपने ‘लव्ह जिहाद’ची जी व्याख्या ठरवली आहे त्यानुसार महाराष्ट्रात अशी प्रकरणे कधी व किती घडली आहेत, ते समोर आणावे, पण उगाच नसलेली थडगी उकरून काढून राज्यातील सामाजिक सौहार्द बिघडविण्याचा प्रयत्न करू नये. भाजपला हिंदुत्वाचा घोर लागून राहिला आहे. लव्ह जिहाद हे त्यांचे नवीन हत्यार आहे. प. बंगाल निवडणुकांनंतर ते हत्यारही भंगारात जाईल, असे सामना अग्रलेखात म्हंटल आहे.
लव्ह जिहादचे प्रकार कुठे सुरू असतील तर ते पाकिस्तान आणि बांगलादेशात. पाकिस्तानातील हिंदू समाजातील महिला, मुली अत्यंत असुरक्षित जिणे जगत आहेत. त्यांना पळवून नेले जाते. त्यांचेही जबरदस्तीने धर्मांतरण करून निकाह लावले जातात. विरोध करणाऱ्या मुलींना ठार केले जाते. त्याच दहशतीखाली अनेक हिंदू कुटुंबे पाकिस्तानातून पळून हिंदुस्थानात आश्रयास आली आहेत. बांगलादेशातही वेगळे काही सुरू नाही. त्यामुळे ‘लव्ह जिहाद’विरोधात शस्त्र उचलण्याची गरज तेथे आहे. अर्थात त्या परक्या प्रदेशात जाऊन भाजप किंवा संघ परिवारास आंदोलन वगैरे करता येणार नाही. पण केंद्रात मोदी सरकार असल्यामुळे ‘लव्ह जिहाद’ प्रकरणी पाकिस्तान, बांगलादेश सरकारला दम नक्कीच भरता येईल. एखादा सर्जिकल स्ट्राइकही करता येईल.
लव्ह जिहाद हा विषय शिवरायांच्या महाराष्ट्रात रुजू शकत नाही. दुसरे असे की, येथे शिवसेनेचा हिंदुत्ववाद कायम आहे. पण आमचे हिंदुत्व म्हणजे खोमेनी छाप धार्मिक उन्माद व त्यावर तरारलेले राजकारण नाही.एक वर्षापूर्वी पहाटे ‘लव्ह जिहाद’ झाला. तरीही महाविकास आघाडीचे सरकार आले व टिकले. ते टिकणारच आहे! असे सामना अग्रलेखात म्हंटल आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’