हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मनसुख हिरेन मृत्यु प्रकरण आणि प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या जिलेटीनच्या कांड्या यांचा तपास एनआयए करत असून या प्रकरणावरून भाजप आणि शिवसेने मध्ये खडाजंगी उडाली आहे. भाजपकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्याची मागणी होत असताना आता शिवसेनेने आपल्या सामना अग्रलेखातुन भाजपला सुनावलं आहे. तसेच पठाणकोट हल्ला आणि पुलवामा हल्ल्यात एनआयए ने नक्की काय तपास केला,असा परखड सवाल देखील केला आहे.
भाजपा नेत्यांना मनसुख हिरेन यांच्या मृत्यूचं जरा जास्तच दु:ख झाल्याचंही अग्रलेखात म्हटलंय. ‘मनसुख हिरन मृत्यू प्रकरणात राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाने हत्येचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असतानाच ‘एनआयए’ने घाईगडबडीत अँटिलिया स्फोटकांच्या प्रकरणाचा तपास हाती घेतला. महाराष्ट्र सरकारला कुठे बदनाम करता आले तर पाहावे यापेक्षा वेगळा ‘उदात्त’ हेतू त्यामागे नसावा.
गुन्हे शाखेतील एका सहाय्यक पोलीस निरीक्षकाच्या भोवतीच हे प्रकरण फिरत आहे व त्यामागचा हेतू लवकरच समोर येईल. कोणत्याही परिस्थितीत यामागे दहशतवादाच्या तारा जुळलेल्या नसताना या गुन्ह्याच्या तपासासाठी ‘एनआयए’ने घुसावे हा काय प्रकार आहे? मुंबईतील वीस जिलेटिन कांड्या हा ‘एनआयए’साठी मोठाच आव्हानाचा विषय ठरताना दिसत आहे,’ असा टोलाही शिवसेनेनं हाणला आहे.
दहशतवादासंदर्भातील घटनांचा तपास एनआयएनकडून होत असतो, पण या जिलेटीनच्या कांड्यांचा तपास करणाऱ्या एनआयएने उरी हल्ला, पठाणकोट हल्ला आणि पुलवामा हल्ल्यात काय तपास केला, कोणते संशोधन केले, किती गुन्हेगारांना अटक केली? हेही रहस्यच आहे, असे शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून म्हटलंय.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा