हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | बिहार विधानसभा निवडणुकीत भाजप-जदयु ची सत्ता आली असली तरी नितीशकुमार यांच्या जडयु ची चांगलीच पीछेहाट झाली असून भाजपने मात्र जोरदार मुसंडी मारली आहे. त्यावरून आता सामनातून नितीशकुमार यांच्यावर निशाणा साधण्यात आला आहे. बिहारात पुन्हा नितीशकुमार येत आहेत, पण लोकांचा तसा कौल आहे काय? मुख्यमंत्री म्हणून जनतेने त्यांना झिडकारल्यावर मुख्यमंत्रीपदी त्यांना लादणे हा लोकमताचा अवमान आहे. या परिस्थितीत तिसऱ्या क्रमांकावर फेकलेल्या नितीशकुमारांनी मुख्यमंत्री म्हणून चढाई केलीच तर त्यांच्या राजकीय कारकिर्दीची ती दारुण शोकांतिका ठरेल. हरलेल्या पहिलवानास विजयाचे पदक देण्यासारखाच तो सोहळा ठरेल. अशा शब्दात सामना अग्रलेखातून शिवसेनेने नितीश कुमारांना फटकारलं आहे.
काय म्हणल आहे सामना अग्रलेखात –
तेजस्वीच्या रूपाने फक्त बिहारलाच नाही तर देशालाच एक तडफदार युवा नेता मिळाला आहे. तो एकाकी लढत राहिला. तो विजयाच्या शिखरावर पोहोचला. तो जिंकला नसेल, पण त्याने पाठही टेकवली नाही. देशाच्या राजकीय इतिहासात या संघर्षाची नोंद नक्कीच होईल. बिहारमध्ये भाकरी फिरेल असे वाटले होते, पण भाकरी साफ करपली आहे. तेजस्वी यादव यांनी थोडी वाट पाहावी. भविष्य त्यांचेच आहे असं कौतुकही शिवसेनेने केले आहे.
बिहारची सूत्रं अखेर भारतीय जनता पक्षाकडे गेली आहेत. नितीशकुमार मुख्यमंत्री होतील, पण भारतीय जनता पक्षाच्या तालावर त्यांना काम करावे लागेल. बिहारात भाजपचा प्रचंड विजय झाला. त्याचे श्रेय पंतप्रधान मोदी यांनाच मिळायला हवे. त्याचा आनंदोत्सवही साजरा झाला, पण आकडय़ांच्या खेळात ‘एनडीए’ला निसटता विजय मिळाला आहे आणि खरा विजेता 31 वर्षांचा तेजस्वी यादव हाच आहे.
चिराग पासवान यांचे प्रयोजन निवडणुकीत नितीशकुमार यांचे पंख छाटण्यासाठीच करण्यात आले. चिराग पासवान यांनी जनता दलाच्या विरोधात जे उमेदवार उभे केले त्यामुळे नितीशकुमार यांच्या 20 उमेदवारांना पराभव पत्करावा लागला. चिराग पासवान यांचा प्रचार हा नितीशकुमारांच्या विरोधात होता. तो प्रचार विषारी होता.
पंतप्रधान मोदी यांनी चिराग पासवान यांची समजूत काढलीच नाही व चिराग भैया आजही राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे घटक आहेत. बिहार निवडणुकांचे निकाल चंचल आहेत. बहुमत काठावरचेच आहे. कोणाचा पाय कधी घसरेल व मन कसे फिरेल, ते सांगता येत नाही. भारतीय जनता पक्षाचा ‘खेळ’ यशस्वी झाला. भाजपचा डंका वाजला. नितीशकुमारांची पीछेहाट झाली.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’