परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे
परभणीचे शिवसेना खासदार, संजय जाधव यांना जीवे मारण्याचा कट रचल्याचा प्रकार उघडकीस आला असून यासाठी नांदेड येथील एका गँगला दोन कोटी रुपयांची सुपारी दिली असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या संदर्भात खासदार संजय उर्फ बंडू जाधव यांनी परभणीच्या नानलपेठ पोलिस ठाण्यामध्ये काल उशिरा तक्रार दाखल केली आहे. दरम्यान यानंतर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
परभणीचे खासदार संजय जाधव यांना जिवे मारण्यासाठी नांदेड येथील रिंदा गँगला दोन कोटी रुपये देत हा व्यवहार झाल्याचं पुढं आलायं. याप्रकरणी खासदार जाधवांनी परभणीत पोलिसात तक्रार दिली आहे. विशेष म्हणजे नांदेड येथील दोन इसमांच्या चर्चेमधून हा प्रकार उघडकीस आलाय. आणि त्यानंतर संजय जाधव यांच्या निकटवर्तीयांना दोन कोटी रुपयात जाधव यांना मारण्यासाठी सुपारी दिल्याचे कळाले आहे. संबंधितांनी खासदार जाधव यांच्या कानावर ही बाब तात्काळ घातली. खासदारांनीही पुढे आलेला प्रकार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कानावर घातला असून, याप्रकरणी परभणीच्या नानलपेठ पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे.
“मागील तीस ते पस्तीस वर्षांपासून आपण राजकारणामध्ये सक्रिय आहोत. या काळात अनेक स्थित्यंतरे आली, जातीय दंगली झाल्या. बरे-वाईट अनुभव आले. परंतु या टोकाच राजकारण कधी परभणी मध्ये झाल नाही. आणि त्यामुळे सुपारी देणारानी स्वतःच आत्मपरीक्षण करावं. ” असा सल्लाही यावेळी खासदार संजय जाधव यांनी दिला आहे.
https://www.facebook.com/1506067669510655/posts/3367720936678643/
असा आहे खा . संजय उर्फ बंडू जाधव यांचा राजकिय प्रवास
खासदार संजय जाधव यांनी राजकारणाची सुरुवात, साधारणपणे तीस ते पस्तीस वर्षापूर्वी केली. शिवसेनेमध्ये अगदी कार्यकर्त्या पासून, त्यांनी आपली राजकीय कारकीर्द सुरू केली होती. त्या अंतर्गत शाखाप्रमुख पासून जिल्हाप्रमुख पर्यंत प्रवास केला. त्यानंतर पक्षाने त्यांना परभणी विधानसभेसाठी, दोन वेळा संधी दिली. त्यांनीही या संधीचे सोने करत, पक्षाला विजय मिळवून दिला. २०१४ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये, शिवसेनेने संजय जाधव यांना लोकसभेसाठी उमेदवारी दिली. त्यावेळी अटीतटीच्या लढाईमध्ये, संजय जाधव यांनी शिवसेनेचा बालेकिल्ला कायम ठेवला. त्यानंतर २०१९ लाही संजय जाधव यांनी, पुन्हा विजय प्राप्त करून सलग दोन वेळा खासदारकी मिळवण्याचा मान मिळवला . मागील महीन्यातच खा . जाधव यांनी जिल्हातील राजकिय कारण देत पक्षप्रमुखांना खासदारकीचा राजीनामा पाठवला होता . त्यामुळे ते चांगलेच चर्चेत आले होते .