राऊतांच्या ‘त्या’ वक्तव्यामुळे गुजरात भाजप नेत्यांना मिरच्या झोंबल्या; माफी मागण्याची केली मागणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अहमदाबाद । गेल्या काही दिवसांपासून संजय राऊत आणि कंगना रानौत यांच्यात शाब्दिक युद्ध रंगलंय. सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाबद्दल बोलतानाच कंगना रानौत हिनं मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली होती. त्यांनंतर ‘जर त्या मुलीनं (कंगनानं) महाराष्ट्राची माफी मागितली तर तिला माफ करण्याचा विचार केला जाईल. तिनं मुंबईला मिनी पाकिस्तान म्हटलं, अहमदाबादविषयी असंच बोलण्याचं धाडस तिच्यात आहे का?’ असे राऊत म्हणाले. यावर गुजरात भाजप नेत्यांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.

कंगनाच्या या वक्तव्याचा संजय राऊत आणि शिवसेनेनं चांगलाच समाचार घेतला. त्यानंतर, कंगनाला मुंबईत न येण्याचा सल्ला देतानाच ‘कंगनात हिंमत असेल तर तिनं अहमदाबादची तुलना मिनी पाकिस्तानशी करून दाखवावी’ असं संजय राऊत यांनी म्हटलं होतं. ‘जर त्या मुलीनं मुंबई आणि महाराष्ट्राला मिनी पाकिस्तान म्हणण्यासाठी माफी मागितली तर मी याबद्दल विचार करेन. तिच्यात एवढी हिंमत असेल तर ती अहमदाबादबद्दल हेच म्हणू शकेल का?’ असा प्रश्नही राऊत यांनी विचारला होता.

संजय राऊत यांच्या या वक्तव्यावर गुजरात भाजपचे प्रवक्ते भरत पंड्या यांनी ‘शिवसेना नेत्यांनी अहमदाबादला छोटा पाकिस्तान म्हणत गुजरातचा अपमान केलाय. यासाठी त्यांनी गुजरात, अहमदाबाद आणि अहमदाबादवासियांची माफी मागावी’ असं पंड्या यांनी म्हटलंय. ‘शिवसेनेनं गुजरात, गुजराती रहिवासी आणि नेत्यांना मत्सर, घृणा आणि द्वेषाच्या भावनेतून निशाण्यावर घेणं बंद करावं’ असंही पंड्या यांनी म्हटलंय. ‘अहमदाबादला मिनी पाकिस्तान म्हणताना संजय राऊत यांनी गुजरातला बदनाम करण्याचा प्रयत्न केलाय. यासाठी संजय राऊत यांनी गुजरातच्या लोकांची माफी मागावी’ अशी मागणी भरत पंड्या यांनी केलीय.

सुशांत सिंह राजपूत मृत्यू चौकशी प्रकरणात संजय राऊत आणि कंगना रानौत वादात भाजपनं कंगनाची बाजू घेतलीय. मात्र, महाराष्ट्रातल्या अनेक मराठी आणि बॉलिवूड कलाकारांनी मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी करणाऱ्या कंगनाला खडे बोल सुनावलेत. दरम्यान, केंद्रीय गृह मंत्रालयाकडून कंगनाला वाय – वर्ग श्रेणीतली सुरक्षा प्रदान करण्यात आलीय. मुंबईत येताच कंगनाला सुरक्षा देण्यात येणार असल्याचं म्हटलं जातंय.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.