हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील विरोधी पक्ष भाजप कडून सातत्याने महाविकास आघाडीतील नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले जात आहेत. केंद्रीय तपास यंत्रणांद्वारे तपास करण्याची मागणी भाजप करत आहे. यावरुन शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी विरोधकांना इशारा दिला आहे. विरोधकांनी राज्य सरकारविरोधात घाव घालावा, ते त्यांचं कामच आहे. पण विरोधकांनी खोट्या तलवारीचे घाव घालू नये, असा इशारा संजय राऊत यांनी भाजपला दिला आहे.
विरोधी पक्षाकडून ज्या पद्धतीने हल्ले सुरु आहेत त्यातील अनेक हल्ले फुसके बार आहेत. पण एकत्रितपणे त्याचा प्रतिकार करणं गरजेचं आहे. जो भ्रम निर्माण केला जात आहे, आरोप केले जात आहेत त्यांना त्याच ताकदीने उत्तर देण्याची गरज मला वाटते असे संजय राऊत यांनी म्हंटल.
यावेळी त्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना टोला लगावला आहे. राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून काही गोष्टींचं स्मरण करून दिलं म्हणता. आम्हीही त्यांना स्मरण करून देत असतो. 12 आमदारांची यादी त्यांच्याकडे आहे. त्याचं आम्हीही स्मरण करून देत असतो. त्यांना बाकी सर्व गोष्टींचं स्मरण होतं. फक्त यादीचंच विस्मरण होतं, असा टोला त्यांनी लगावला.